सोमवार, १ जून, २०२०

सेवानिवृतांचा परिसस्पर्श

सुचलेले काही...
🍁🍃🍂🍁🍂🍃
*सेवानिवृत्तांचा परिसस्पर्श*

काल 31 मे...शैक्षणिक सेवेतील अनेक शिक्षक बांधव- भगिनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.आजपासून या सर्वाचे आयुष्य एका नवीन विश्वात प्रवेश करेल.आतापर्यंत या सेवेत राहून प्रामाणिकपणे कार्य करताना अनेक अनुभव   घेत त्यांनी स्वतःसाठी करावयाच्या अनेक गोष्टींचा निश्चितच त्याग केला असेल.शिक्षक म्हणजे देशाचे उन्नत स्वप्न रुजवणारा घटक.ही स्वप्नं रुजवताना स्वतःच्या स्वप्नांचा मात्र त्याला विसर पडलेला असतो. अशी अनेक अपूर्ण स्वप्ने मनाशी बाळगत त्याचा हा प्रवास अखंडपणे, निरपेक्ष वृत्तीने,अहंकार विरहीत, सदैव हसतमुख विद्येच्या प्रांगणात सुरू असतो.30- 35 वर्षांच्या सेवेत स्वतः समोर असलेल्या निरागस मुलांना घडवताना मनात जपलेले अनेक क्षण त्याच्या हातून निसटतात. पण तरीही त्याची कसलीच चिंता ,वेदना मनात न बाळगता अखंड पणे समाजाच्या ऋणात राहून ते फेडण्यासाठी त्याची नित्य धडपड सुरू असते.विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचे यश मानणारा हा एकमेव साधक. 
       आज तो या ऋणातून मुक्त होणार असतो नि त्याने घडवलेला समाज,उभारणी केलेले राष्ट्र सदैव त्याचा ऋणी बनतो.माझ्या गत 20 वर्षाच्या सेवेत  मी माझ्यासोबत कार्यरत अनेक गुरुवर्यांची सेवानिवृत्ती  अनुभवली. यातील काही प्रत्यक्ष सोबत कार्य करणारे,काही प्रशिक्षणाच्या माध्यमातून जोडले गेलेले,काही कार्याच्या निमित्ताने जोडलेले.... या सर्वांनी मला त्यांच्या कार्यातून,मार्गदर्शनातून,चर्चेतून ,त्यांच्या अनुभव कथनातून नेहमीच समृद्ध केले. शैक्षणिक सेवेतील कार्य प्रामाणिकपणे कसे करावे हे सांगतानाच जीवन समृद्ध करण्याच्या गोष्टींची देखील शिकवण मला यांच्याकडून लाभली.सत्ता,संपत्ती,पद ,प्रतिष्ठा,मान या माणसाला भ्रष्ट करणाऱ्या प्रवृत्तीपासून स्वतःला कसे वाचवायचे अन समाधानी आयुष्य,इतरांना हेवा वाटावा असे आयुष्य कसे जगावे ,कार्य कसे करावे याच्या अनेक गोष्टी यांच्या अनुभवाने मला लाभल्या.परीसस्पर्शाने लोखंडाचे  सुवर्ण होते हे ऐकिवात आहे.प्रत्यक्ष कोणी पाहिले नाही.पण या सर्वांच्या परीसस्पर्शाने माझ्या आयुष्याचे सुवर्ण होतानाचा अनुभव मात्र मी घेत आहे.

    पेशाशी प्रामाणिक राहुन कार्य केलेल्या या सर्वांना यापुढील आयुष्य अखंड आरोग्यसम्पन्न,सुखी-समाधानी व त्यांच्या समस्त इच्छा पूर्तीचे दीर्घायु जावो..हीच सदिच्छा!!!
✍️ सुवर्णविलास
दि.01/06/2020
www.suvarnvilas.blogspot.com