गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

चारोळ्या

*चारोळी*

डोळे भरलेले पाण्याने
दिसणार नाहीत तुला
आठवांनी तुझ्या मन हेलावले
कधी कळणार नाही तुला.

*© स्वरचित*
*---सुवर्णविलास4*

*चारोळी*

भरले डोळे पाण्याने
कसे दाखवू तुला
व्याकुळला जीव आठवणीने
कसे सांगू तुला.
©स्वरचित
*----सुवर्णविलास4*

शनिवार, १७ डिसेंबर, २०१६

मुक्त कविता

*मुक्तकविता*

गीत गतीचे गा रे माणसा
गीत गतीचे गा
जीवनाच्या या वाटेवरती
तू गीत गतीचे गा.

झुगारून दे बंधने तू
सोडून दे मोहपाश तू
ताठ मानेने जग जीवन 
नच हो भयभयीत तू

अर्थ जीवनाचा घे जाणून
करू नको तू स्वार्थ कशात
देण्यातच असतो आनंद खरा
जाणून घे तू हा मंत्र जीवनात

कास धर तू शिक्षणाची
सेवा कर तू मानवतेची
रक्षण करुन तू दुर्बलांचे
चिंधडी कर तू अन्यायाची

गीत गतीचे गा रे माणसा
गीत गतीचे गा
जीवनाच्या या वाटेवरती
तू गीत गतीचे गा.

✍�©----सुवर्णविलास 4

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

चला विषमता नष्ट करुया...

*चला विषमता नष्ट करुया!*

*कुणा ना तुच्छ लेखावे*
*समस्ता बंधू मानावे..*
पूज्य सानेगुरुजींच्या खरा तो एकचि धर्म... या प्रार्थनेतील या ओळी समस्त मानवांमध्ये एकात्मतेची भावना जोपासण्याचा संदेश देतात. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रमाच्या दहा गाभाघटकांत *राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्याचा* उल्लेख केला आहे. *भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतही दर्जाची व संधीची समानता तसेच राष्ट्राची एकता व एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार केला आहे.* एकंदरीत सर्वच ठिकाणी सामजिक,धार्मिक,जातीय ,लिंगभेद,आर्थिक,शैक्षणिक तसेच राजकीय स्तरातील आढळणारी विषमता नाहीशी करण्याचा प्रयास केल्याचे दिसून येते. या सर्व स्तरातील विषमता पूर्णपणे नष्ट झाल्याखेरीज राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न पूर्णत्त्वास जाणे अशक्यप्राय आहे.
           *संतांपासून ते शाहू-फुले-आंबेडकर या समाजोद्धारकांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील विविध प्रकारची असणारी ही विषमता नष्ट करण्यास व्यथित केले.*केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीतून यांनी विषमतेवर जोरदार प्रहार केले. तथकथित सनातनी धर्मरक्षकांनी याविरुद्ध प्रचंड आरडाओरड केली.यांतून शाहू-फुले,आंबेडकर या त्रयींना खूप त्रास सहन करावा लागला. वेदोक्त प्रकरण,घरचा त्याग, शुद्र म्हणून जिथे-तिथे हेटाळणी अशा अनेक प्रकारांना यांना सामोरे जावे लागले. पण तरीही आपल्या कार्यापासून तसुभरही न डगमगता हाती घेतलेले समाजोद्धाराचे कार्य या सर्वांनी निस्वार्थपणे केले. याचेच फलित म्हणून भारतीय राज्यघटनेत वर नमुद केलेल्या सर्व स्तरातील विषमता नष्ट होण्यासाठी विभिन्न कलमांचा समावेश केला आहे.
               तथापि *केवळ कायदे करून परिवर्तन घडत नाही.* स्वातंत्र्यानंतर, राज्यघटना अंमलात आणल्यानंतरही उपरोक्त क्षेत्रातील विषमता नष्ट झाली असे अजिबात नाही. देशभरात अनेक ठिकाणी  धार्मिक,जातीय,राजकीय कारणांवरून होत असलेल्या दंगली, गरीब-श्रीमंत यांत रुंदावणारी दरी, शिक्षणाचे होत असणारे बाजारीकरण,राजकारणातील ध्रुवीकरण,स्त्रियांवर होणारे अत्याचार, समाजातील मुलींचे प्रमाण हे सर्व पाहता वर्तमान समाजात अद्यापही भयानक विषमता असल्याचे जाणवते.ही विषमता नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे *स्वयंशिस्त* हाच आहे. सामजिक,धार्मिक,जातीय ,लिंगभेद,आर्थिक,शैक्षणिक तसेच राजकीय स्तरात विवेकाचा,संस्कृतीचा  आचार हीच  स्वयंशिस्त होय जी प्रत्येक नागरिकाने आपल्या मनाला लावून घेतली पाहिजे.सर्वच ठिकाणी आपणच श्रेष्ठ असावे,आपलाच लाभ व्हावा, गरजेपेक्षा अधिकची लालसा या गोष्टी विकृतीचे लक्षण आहेत याउलट प्रत्येकास आवश्यक्तेनुसार मिळावे ही भावना जोपासणे
हे संस्कृतीचे ,विवेकाचे लक्षण मानावे. आशा विवेकपूर्ण वर्तनाचा प्रत्येकाने अंगीकार करून समाजातील सर्वच विषमता नष्ट करता येईल. नि ख-या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साकारली जाईल.

✍�*�--- *सु* वर्ण *वि*लास *4*©

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

आमच्या जगातच वावर

*आमच्या जगातच वावर*

आजच आठवतो आम्हां
26/11 चा तो थरार
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच करतो आम्ही
संविधानाचा जागर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच प्रामाणिक आम्ही
चिड आमची काळ्या पैशांवर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच बंधुभाव आमचा
पदरी काही हवे असल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच क्रोध आमचा
बलात्कार इथे झाल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच शोक आमचा
दुर्घटना इथे घडल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच निषेध आमचा
अन्याय इथे झाल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच होतो आक्रोश आमचा
शेतक-याची आत्महत्त्या झाल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर

आजच देशप्रेम आमचे
जवान शहीद झाल्यावर
इतर दिवशी मात्र आमचा
आमच्या जगातच वावर.

*----स्वलिखित*
*सु*वर्ण *वि*लास *4*

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

चारोळी

सुख-दुःख कोणा सांगावे
उमजेना माझ्या मनाला
गर्दित माणसांच्या या
मी शोधत आहे प्रेमाला.
----सुवि4

देता अलिंगन मृत्यूला
मृत्यूही क्षणभर थबकला
ओढ मरणाची पाहून
मनातून तोही हबकला.
---सुवि4

मनी ओढ प्रेमाची
स्वस्थ बसू देईना
प्रेमभंग झाला तरी
तिजविन जगता येईना.
---सुवि4

माणसा माणसा
कधी होशील रे माणूस
माणसांच्या गर्दित मी
शोधत आहे रे माणूस.
---सुवि4

शोधात माणसांच्या
गर्दित हरवलो मी
शोधत स्वतःला
माणसांत हरवलो मी.
*-----स्वलिखित*
----- *सु*वर्ण *वि*लास *4*

देव नको  माणसातला मला
लागतात सारे त्याला पूजाया
हवा फक्त माणूस त्याच्यातला
गर्दित या माणुसकी जपाया.
--सुवर्णविलास4

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

बालपण

*बालपण*

एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून
उगी उगी रूसायचं
तोंडाचा चंबू करून
दिवसभर बसायचं.

शाळेच्याच दिवशी
आजारी पडायचं
पोटात दुखतयं
हेच दुखणं असायचं.

घरी राहून दिवसभर
नुसता दंगा करायचा
आईच्याच भोवतीनं
दिवस सारा जयाचा.

लपाछपी,सूर-पारंब्या,
विटी-दांडूचा खेळ भारी रंगायचा
आबिधाबिच्या खेळात मात्र
जीव मेटाकुटीला यायचा.

झाडांवर सरसर चढून
ऎट सर्वांना दाखवायची
चिंचा,कै-या,आवळे,पेरू
जांभळे,करवंदे मनसोक्त खायाची.

मित्रांसोबत मजेत
गावभर हिंडायचे
अंधार पडताच
सुसाट घर गाठायचे.

सायंसमयी दिप लावुनी देवापुढती
शुभंकरोति म्हणायची
पाढे,कविता,प्रश्न-उत्तरे
उजळणी सा-याची करायची.

चमचमीत भाजी,चुलीवरची भाकरी,
मऊ-मऊ दूध -भात खायाचे
आकाशातील ता-यांशी गप्पा मारत
अंगणातच झोपी जायाचे.

एकचि वरदान मला देगा देवा
आयुष्य पुन्हा असेच जगायचे
बालपणीचा काळ तो सुखाचा
पुन्हा-पुन्हा मला अनुभावयाचे.

      *-------स्वलिखित*
© *सु*वर्ण *वि*लास  *4*
suvarnvilas.blogspot.com

sunilaswale80@gmail.com

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

लेख

*पाल्याचे करिअर : स्वप्न की स्वप्नांचे ओझे!*

        आजकाल 'पाल्याचे करिअर' हा शब्द जिथे-तिथे परवलीचा बनला आहे.जो-तो आपल्या स्वतःच्या,नि पालक आपल्या पाल्याच्या करिअर चीच चर्चा करताना आढळतात.करिअरची नेमकी व्याख्या काय? याचे उत्तर कोणालाच नेमकेपणाने सांगता येते हे शक्य नाही.केवळ भौतिक सुख-सुविधांची मुबलक प्रमाणात पुर्तता करता यावी यास्तव मोठ्या पगाराची नोकरी अथवा भरपूर अर्थार्जन करता येणारा व्यावसाय करता येणे नि त्यादिशेने वाटचाल करण्यास उपयुक्त मार्गाच्या दिशेने जाणे म्हणजे करिअर! व त्यासाठी शिक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी स्व-क्षमतेची,अभिरूचीची किंवा पाल्याच्या क्षमतेची,त्याच्या अभिरुचीची जाणीव न ठेवता वरील मृगजळामागे दिशाहीन  धावत राहणे हेच करिअर की काय ही शंका पालक नि पाल्य दोहोंच्या वर्तनातून आज पदोपदी पाहायला मीळते.
         खरेतर स्वतःचे करिअर नेमके कोणते नि ते कसे घडवावे याचा नेमकेपणाने विचार करण्याची संधी स्वतः पाल्यास आहे हे चित्र फार दुर्मिळ ठिकाणी पाहायला मिळते.बहुतांश कुटुंबात पाल्याच्या करिअरची दिशा ही पालकच ठरवतात नि त्याच्या पुर्ततेस्तव पाल्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात.आपणांस जे लाभले नाही ते माझ्या मुलांना मिळाले पाहिजे या पालकाच्या मानसिकतेला बहुतेक करून भौतिक सुखाचीच किनार असते.या खोट्या भ्रमात राहून पालक आपल्या पाल्यास या जिवघेण्या स्पर्धेत ऊर फुटेस्तोवर पळण्यास भाग पाडतो.नि पाल्यही आपल्या पालकाच्या स्वप्नाखातर प्रचंड मानसिक दबावात स्वतःला रेटण्याचा प्रयास करतो. हा त्याचा प्रयास बहुतेकवेळा अपयशी किंवा असमाधानी ठरतो त्यातून त्याच्या स्वतःच्या नि पालकांच्या वाट्याला निराशा येते.या नैराश्यतेतून बाहेर पडणे ज्या मुलांना जमत नाही ती मुले व्यसनाधीन होणे किंवा आत्महत्त्येच्या मार्गाचा स्वीकार करतात की जो पूर्णतः योग्य नाही.
             आपल्या पाल्याने त्याच्या आयुष्यात पुढे जाऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे नि त्यासाठी त्याने विज्ञान शाखेतच प्रवेश घ्यावा ,12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरींग प्रवेशासाठीच्या प्रवेशपरिक्षेत यश मिळवावेच या हट्टाहसाने पेटलेला पालक आपल्या पाल्याच्या; त्याच्या स्वप्नांचा,विचारांचा,इच्छेचा क्वचितही विचार करताना दिसत नाही.याचे परिणाम व्हायचे तेच होतात. अनिच्छेने आत्मप्रेरणेशिवाय  केलेले कोणतेही कार्य कधीच यशस्वी होत नाही . यातून जीवनात तणावाची स्थिती निर्माण होते नि तणावपूर्ण  मनस्थितीत विचारांचा लोप होतो.यातून मुले बंडखोर,चिडचिडी,एकलकोंडी,व्यसनी होण्याचा संभव अधिक निर्माण होतो.काही प्रसंगात पालक व पाल्याचे याबाबतीत योग्य समायोजन नाही झाले तर तणावग्रस्त मुले आत्महत्त्या करतात.
               आजकाल तर पालक आपल्या पाल्याच्या करिअर ची दिशा त्याच्या जन्मापुर्वीच ठरवत आहे हे खरेच भयाण वास्तव आहे.त्यादिशेने हे पालक त्याची शाळानिश्चीती करणे,ट्यूशन निश्चीती करणे,विविध संस्कारशिबिरांना? त्यास धाडणे,सतत त्याच्या शिक्षणाबाबत जागरूक? रहाणे, हे असले अजब प्रयास करून पाल्याच्या करिअरचे स्वप्न स्वतःच पाहतात की जे स्वतःपाल्याच्या दृष्टिआड असते. नि अशा अदृश्य स्वप्नांमागे धावण्याचा,धावण्यास लावण्याचा अकल्पित प्रकार पालक करतांना दिसतात.जीवनात स्वबळावर,स्वसमजुतीने आचंबित करणारे यश संपादन करून आपले करिअर घडविलेली अनेक यशस्वी माणसांची चरित्रे पाहता त्यांच्या जडण-घडणीत त्यांचे स्वतःचे विचार,प्रयत्न असल्याचे दिसते.या यशस्वी माणसांच्या पालकांनी त्यांच्यावर कोणत्याही स्वतःच्या अपेक्षांचे ओझे,बंधन लादल्याचा कुठेही उल्लेख नाही. तरीही आजचा सुजाण पालक याच्या विपरीत वागताना दिसतो.आजकाल एखादया घरातील पाल्य 10वी किंवा 12 वी स आहे किंवा एखादी प्रवेशपरीक्षा देणार आहे हे त्या घरातील आई-वडिलांच्या तणावग्रस्त चेह-यांना पाहून कोणासही सहज लक्षात येते.आपल्या पाल्यांच्या करिअरची स्वप्ने स्वतः रेखाटून त्यात पाल्यास आपल्याच अपेक्षेचे रंग भरायास सांगणे नि उत्तम कलाकृतीची अपेक्षा करणे योग्य ठरते का? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत पालक मुल घडविणे म्हणजे फुलास त्याच्याप्रमाणे उमलू देणे त्याचा रंग ,रूप ,आकार, गंध त्याला हवा तो धारण करू देणे,त्यावर आपल्या अपेक्षांचे बंधन न लादता  आपण केवळ योग्य तितके ,योग्य ते खत-पाणी देणे हे घडत नाही तोपर्यंत अनुत्तरितच असेल.

  @  -----स्वलिखित
श्री.सुनील विलास अस्वले.
मु.पो.वडणगे,ता.करवीर, जि.कोल्हापूर
पदवीधर अध्यापक वि.मं.पोहाळे/आळते,
ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.
मोबा.9049211785
sunilaswale80@gmail.com
suvarnvilas.blogspot.com

*चारोळ्या*

1) राजकीय इच्छाशक्तिने
    दाखविला असा इंगा
    काळा पैसा बाळगणा-यांनो
     घेऊ नका आता पंगा.

2) उमलण्या आधीच खुडतात
      इथे गर्भातच कळ्या नाजूक
वंशाचा दिवा मुलगाच समजून
करतात अजूनही अशी घोडचूक.

@ *------स्वलिखित*
---- *सु*वर्ण *वि*लास. *4*

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

*पैसा*

पैशाच्या मागे धावते
दुनिया ही सारी
पैशाभोवती फिरते
दुनिया ही सारी

रात्रीची नसे झोप
वेदना असे उरी
पैशासाठी वेडी झाली
दुनिया ही सारी

आजचे जीवन लयास
भविष्याची चिंता करी
पैशासाठी अस्वस्थ झाली
दुनिया ही सारी

पैशाविन दिसे न काही
स्वप्नी ,मनी विचार करी
पैशास्तव अबोल झाली
दुनिया ही सारी

पैसे झाले सखे-सोयरे
पैशावरच प्रीत खरी
पैशाच्याच स्नेहात गुंतली
दुनिया ही सारी

पैशापुढती तुटली नाती
मनी न राहिली प्रीत खरी
पैशासच सर्वस्व मानते
दुनिया ही सारी

असा पैसा असावा गरजेपुरता
लोभ अति तो मनी न धरी
पैशाविन सुखी व्हावी
दुनिया ही सारी.

*-----स्वरचित.* दि.10/11/2016
---सुवर्णविलास

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

नादचारोळी

[7/26, 12:01 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): ***----* चिञशलाका स्पर्धा*---*
         भाग--13वा

संचारली विरश्री रक्तात तुमच्या
घोट घेतला नरडीचा शत्रुच्या
विजयपथ तो दृष्टिपथास आला
प्रणाम आमचा शौर्याला तुमच्या
------सुवर्णविलास.
[8/2, 11:54 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): **स्पर्धेसाठी**

अथांग या सागरासवे
गहिरे नाते तुझे नि माझे
आयुष्याच्या या हिंदोळ्यावर
मना ओढ सख्या तुझीच  असे.

----- सुवर्णविलास.
[8/3, 1:53 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
काळजावरी घाव घालीत
काळरात्र ती आली अशी
कोसळला पुल असा हा
भयाण अशी ही  नियती कशी?
(स्पर्धा नको ,संवेदना महत्त्वाच्या.)
[8/4, 10:51 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
साहित्य दर्पण आयोजित ,
नाद चारोळी स्पर्धेसाठी.

नीलांबरी या रविराजाची स्वारी
अकस्मात येई पहा श्रावणसरी
करीत सप्तरंगांची उधळण नभी
अवतरला श्रावण पहा धरतीवरी.

सुवर्णविलास(श्री.सुनील विलास अस्वले) 9049211785
[8/4, 2:16 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्वरचित चारोळी...

अंगावर लेऊनि हिरवा शालू
पहा कशी ही धरित्री सजली
श्रावण सरी करती अभिषेक
हळूच पहा ती बाला हसली.

---सुवर्णविलास.
[8/9, 3:37 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): चित्रशलाका स्पर्धेसाठी
***********************
अथांग दर्याच्या किनारी
साकारले स्वप्न रेतीत मनाचे
साक्ष तयाचा कळस देई
उज्ज्वल भविष्य निर्मिकाचे.
-----------------------------------------
----सुवर्णविलास (40)
[8/9, 9:35 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): हाती घेवूनी मशाल क्रांतिची,
दिली आहुती सर्वस्वाची,
मुक्त करण्या भारतमाता ,
अवघा सारा देश एकवटला.

बलिदाने या इतिहास घडला,
स्वतंत्र झाली भारतमाता,
स्मरण करीत तव बलिदानाचे,
वंदन करुया भारतभूला.
------ सुवर्णविलास.
[8/11, 3:20 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस* 👉�

सासरी जाता लेक लाडकी
गहिवर दाटला माय-बापाच्या मनी
आसवातुन ओघळे प्रीत मनाची
हुंदका तो होई अनावरी.

---सुवर्णविलास (40)
9049211785
[8/11, 3:42 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): असंख्य वेदना या जीवनी
परी प्रीत मी केली तयांवरी
नयनी न आले अश्रु कधी
हुंदका दाटला जरी उरी.

स्पर्धेसाठी *नाही*
[8/11, 5:53 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): माय-बापाच्या प्रीतिचा
हुंकार का नाही जाणवला तुला
हुंदक्याला आज हुंदका आला
कोसळलास असा कसा रे पुला.
----सुवर्णविलास (40)

स्पर्धेस *नाही*
[8/11, 10:12 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): करून बहाणे
लाजून पहाणे
मला  आठवते
ते हसणे.
[8/15, 3:39 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *आकस्मात चारोळी स्पर्धा*

*उंच माझा झोका*

उंच माझा झोका देई
उन्नतीचे स्वप्न या जीवनी
परी साद ऐकून धरतीची
येई मागे पुन्हा परतुनी.
------------------------------
स्पर्धेसाठी 👆�
---सुवर्णविलास (40)
[8/16, 12:25 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका चारोळी स्पर्धेसाठी*
पुस्तक माझे सखा सोबती,
समृद्ध होईन वाचून तयां मी,
जरी मी जगता आहे पणती,
उजळेन दशदिशा ज्ञानप्रकाशाने मी.

✍🏻  सुवर्णविलास (40)
         9049211785
[8/18, 5:26 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्पर्धेसाठी 👉�
सागरापरी अथांग जिची माया
ती बहीण ओवाळते या भाऊरायास
घडे परिसस्पर्श जीवनी या माझ्या
रक्षाबंधनाच्या या शुभदिनास.

------सुवर्णविलास (40)
[8/23, 12:09 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेसाठी*

तोल सावरते दोरीवर चिमुकली
बाप वाजवातो ढोल
पोटाची या खळगी भरण्या
नसे आम्हां जीवाचे मोल.

*----सुवर्णविलास (40)*
[9/6, 10:19 AM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेस*

डोईवर असे भार जरी
हॄदयी असे आस शिक्षणाची
लेक वाचवा ,लेक शिकवा
हिच आहे नांदी भविष्याची .

*---सुवर्णविलास(40)*
[9/19, 12:47 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): शहिद वीर जवाना
नमन तुझ्या शौर्याला
नापाक इरादे उधळले तू
बलिदाने रक्षिले तू मायभूला.

-----सुवर्णविलास (40)
मनस्वी श्रद्धांजली पर (स्पर्धेसाठी नाही)
[9/22, 12:30 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): स्पर्धेसाठी
*जीवन एक संघर्ष*

जीवन एक संघर्ष
मजा याची घेऊन बघ
मोडला पहिला  डाव जरी
दुसरा पुन्हा खेळुन बघ.

----सुवर्णविलास (40)
[9/29, 1:57 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): साहित्य दर्पण आयोजित...
नाद चारोळी स्पर्धेसाठी

*‘धगधगती आग दहशतवाद’*

धगधगती आग उरातील आमुच्या
बेचिराख करील हा दहशतवाद
नापाक इरादे उध्वस्त करा एकदाचे
बस्स झाला आता हा संवाद.

------सुवर्णविलास (40)
[10/6, 2:03 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

*सहवास तुझा माझा*
आचंद्र-सूर्य तारे राहील
आयुष्याची सोबत आपली
जन्म-जन्मातरी अशीच राहील

------सुवर्णविलास(40)
[10/11, 12:22 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *चित्रशलाका स्पर्धेस*

शुभदिनी या लुटुया सोने
क्षण मांगल्याचा संपन्न करू जीवनी
संदेश शांततेचा बुद्धांचा
आचरु सर्वांनी या शुभदिनी.

----सुवर्णविलास(40)
[10/13, 6:34 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

राजकारणात हवी सत्ता
म्हणून धर्म तुम्ही वापरता
अजाण नाही आता ही जनता
जसे तुम्ही  समजता.

------सुवर्णविलास(40)
[10/18, 1:46 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *सचित्र चारोळी स्पर्धेस*

स्मरण करुनी दाभोळकरांचे
अंधश्रद्धेला दया मुठमाती 
स्वागत करुनी स्त्री जन्माचे
उजळु दया पणती.

*-----सुवर्णविलास (40)*
[10/20, 5:57 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नाद चारोळी स्पर्धेस*

सर्वस्व अर्पुनी संसारासाठी
लेक नांदते सासरी
परी सणवार येता
मायलेकीला ओढ माहेरची.

-----सुवर्णविलास (40)
[10/27, 12:02 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास): *नादचारोळी स्पर्धेसाठी*

तुझ्या जन्माने मन माझे सुखावले
मनमोहिनी तू जीवन माझे फुलविले
पाहता गालावरची खळी तुझ्या
हास्य माझ्या मुखावर अलगद विसावले.

✍ *सुवर्णविलास (40)*
[10/30, 9:31 PM] सुनील अस्वले(सुवर्णविलास):
बेचिराख झाली यांची माणुसकी
सेल्फीचा मोह यांना आवरेना
यातना किती भयाण इथल्या
जाण ना याची मनी  असेना.

(औंरंगाबाद मैदानावर सेल्फी काढणा-या महाभागांसाठी)

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती


           
               *लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
      
           स्वतःकडे जे जे आहे ते ते स्वतःसाठी राखून ठेवणे ही मानवी प्रकृती,आहे त्यापेक्षाही अधिकची अपेक्षा करणे ही विकृती आणि जे जे आहे ते ते स्वतःस गरजेइतके ठेवून उपेक्षितांना देणे ही संस्कृती.देण्याचा आनंद हा भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा.पूर्वीपासून आदर,प्रेम,संस्कार,नितिची-चारित्र्याची शिकवण,भूतदया हे सर्व देणे नि जपणे ही गोष्ट म्हणजे संस्कृती आहे.निसर्ग हा संस्कृती चा आद्यगुरु आहे.निसर्ग हा पर्यावरणातील सर्व घटकांना आपल्याकडे जे जे आहे त्याची मुक्तहस्ते निरपेक्ष भावनेने देत उधळण करतो नि चराचरात आनंद भरून टाकतो.  आपल्या कृतीने,कर्तुत्वाने,वृत्ती-प्रवृत्तिने ,आचरणाने इतरांच्या चित्तवृत्ति उल्हासित करता येणे हीच खरी संस्कृती होय, जी या भारतवर्षात अनादिकालापासून नांदत आली आहे. आश्रम,गुरूकुल,एकत्रित कुटूंबे,शेजारी,लहान गावे ही संस्कृती निर्मिती,संवर्धन नि दृढीकरणाची प्रमुख स्थाने पूर्वी ओसंडून वाहत होती.याच्या प्रवाहात अनेक सद्विचारांची निर्मिती होऊन या विचारांनी समाजजीवनात सुसंस्कृतीची रुजवण केली.
               मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.सुसंस्कृतीचे जतन केल्यानेच मनुष्याच्या सामाजिकतेची जोपासणा आजतागायत झालेली दिसून येते.जेव्हा- जेव्हा,जिथे-जिथे संस्कृतीचे अध:पतन झाले तिथे त्या समाजाचा पर्यायाने मानवाचा विनाश घडल्याचे इतिहासापासून आपणांस पाहायला मिळते. संस्कृतीच्या निर्मितीत मानवाचा मोठा वाटा आहे.निसर्गदत्त लाभलेल्या भौतिक सुविधांचा,जीवनाचा आपल्या प्रयत्नांनी योग्य तो बदल घडवून सर्वांसाठी आनंदप्राप्ती,उपयुक्ततता निर्माण करणे म्हणजे संस्कृती.
            फार वर्षापूर्वी गावे होती आणि तीही लहान होती पण या लहान गावात राहणारी माणसे परस्परांजवळ होती,मनाने मोठी नि निर्मळ होती.गाव म्हणजे जणू एक अख्खे मोठे कुटुंबच होते.मंदिरात भजन-किर्तने होत असत,पारावर गप्पा व्हायच्या, घरा-घराची सुख-दु:खे ही गावाची सुख-दु:खे व्हायची.माणसं माणसाला जपायचीत.पणजी -पणजोबा,आजी-आजोबा या कुटुंबाच्या वटवृक्षाच्या छायेत सारे कुटूंब भरून पावलेले असे. या ज्येष्ठांच्या बोलण्याचालण्यातून,नित्य वर्तनातून भारतीय संस्कृती व्यक्त होत असे.
                    संगीत,साहित्य,धर्म,मानवता,तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्या संवर्धनात आनंद शोधणे हे संस्कृतीचे सार आहे.ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो असे मानत असे की आत्म्याचे संस्करण हाच संस्कृतीचा कळस आहे.मानवाच्या ठायी असणारे दुस-याप्रती उन्नत आणि उदात्त भाव हेच या भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान  आहे.  एकपत्नी,एकवचनी श्री प्रभू राम  , श्रीकृष्णाची गीता, कर्णाचे औदार्य,एकलव्याची गुरुभक्ती, ज्ञानेश्वरांचे पसायदान,संतांची शिकवण ,जिजाऊंचे संस्कार,शिवरायांच्या मातृभक्ती,महात्मा गांधीजींचीअहिंसा,क्रांतीकारकांचा त्याग व बलिदान या सर्वांत भारतीय संस्कृती सामावलेली आहे. संस्कृती ही जगण्यात असते सांगण्यात नसते. *संस्कृती ही आईच्या दुधाप्रमाणे असते.*मानवाचे भरण-पोषण निरपेक्षपणे करण्याचे कार्य संस्कृती करते.जन्मने नि जगणे ओघाने घडते,ती एक प्रकृती असते पण कशासाठी जगावे हे या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीच्या झोपडीत शोधावे लागते. आज चंगळवादी,सुधारणावादी जगात या कुटिराचे मुल्य लोप पावत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते.
                ज्ञानविज्ञानाच्या बळावर स्वतःला प्रगत म्हणवणारी आजची विकृती भारतीय संस्कृतीचा -हास करू पाहत आहे.क्षणिक सुखाने जगावे कसे हे या आधुनिक जगातील सुधारणा सांगत आहेत पण कशासाठी नि कोणासाठी जगायचे, जीवनाचे शाश्वत सुख कशात आहे हे संस्कृतीच सांगते.पैशाने विकत घेता येणारी सुखे मानवाच्या आयुष्यातुन उठवत आहेत याउलट संस्कृतीने लाभणारे सुख मानवाचे आयुष्य घडवते हेच आजचा मानव विसरून सुधारणेच्या नावाखाली ऊर फुटेस्तोवर नुसताच धावत आहे.विज्ञानाच्या क्रांतीने जग भौतिकदृष्टया जवळ आले आहे पण या प्रगतीने माणूस माणसांपासून दुरावला आहे.बाह्य आनंदात रमलेल्या माणसाने आत्मिय सुख,आनंद नक्कीच गमावला आहे.आपली संस्कृती ही आपल्या असण्यात असते. सुधारणा ही आपल्या दिसण्यात असते. असणे नि दिसणे यांत दिसण्याने असण्यावर आज मात केली आहे. भारतीय संस्कृती हे साक्षात जीवनदर्शन आहे.पण आजकाल हे लोप होत आहे.वर्तमान युगात भौतिक प्रगतीचा वेग वाढला आहे पण समाजाची सांस्कृतिक पातळी खालावली आहे.चिरेबंदी वाडे,लहान घरे असणारी लहान गावे नि त्यातील असणारा कौटुंबिक जिव्हाळा लयास जाऊन फ्लँट,बंगले,शहरे यांत स्वतःच्याच भावविश्वात रमलेल्या,नात्यागोत्यांचा विसर पडलेला माणूस आधुनिकतेत स्वतःला अक्षरश: भरडत आहे. आज जगातील सुधारणेच्या नावाखाली स्वतःच्या आयुष्याला स्वतःच छळलेले लोक भारतीय संस्कृतीचे आचरण करून जीवनाचा आनंद सोहळा करत आहेत पण पिकते तिथे विकले जात नाही,दुरून डोंगर साजरे या उक्तींप्रमाणे आपण भारतीय आधुनिकीकरणाची पट्टी स्वतःच्या डोळ्यांना बांधून भारतीय संस्कृतीच्या लख्ख प्रकाशातून अधोगातीच्या अंधाराकडे वाटचाल करत आहे.अस्तव्यस्त शहरीकरण,विभक्तकुटुंबे,वाढतेवृद्धाश्रम,अनाथालये,पाळणाघरे,वाढती व्यसनाधिनता,बालगुन्हेगारी,शिक्षणाचे बाजारीकरण,वाढता भ्रष्टाचार,बदलती आधुनिक जीवनशैली,भ्रमनिरास करणारी ऐहिक सुखे ,हरवलेली संवेदना या सगळ्यांच्या प्रबळतेपुढे भारतीय संस्कृतीचे आकाश मळभले आहे.
                वर्तमान युगात आधुनिकतेची कास धरून जगासोबत प्रवास करणे जरी गरजेचे असले तरी हा प्रवास भारतीय संस्कृतीच्या गाडीतून व्हायला हवा.यामुळे अपघात न घडता समस्त मानव कल्याणाच्या ध्येयापर्यंत पोहचणे नक्की होईल.आधुनिक विश्वाच्या सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य भारतीय संस्कृतीकडून व्हावे.
                जय हिन्द-जय भारतीय संस्कृती!

-----सुवर्णविलास (40)