Teacher


शिक्षक : काल नि आज

'गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा.'
अज्ञानास ज्ञानाची कवाडे निरपेक्षपणे उघडी करून देणारा गुरु,अंध:कारात स्वतः दिप होऊन प्रकाश देणारा गुरु,सुर्यासम
ख-या मित्राची भूमिका बजावणारा गुरु,प्रसंगी कुसुमाहुन मृदू तर कधी वज्राहुन कठीण होणारा गुरु,शिष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा गुरु.गुरुची अर्थात शिक्षकाची अशी अनंत रुपे आपणांस पहायला मिळतात.पूर्वीच्या काळापासून मनुष्याच्या जीवनाचा कायम भाग असणा-या शिक्षणातुन मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करून देण्याचे कार्य शिक्षकरूपी परिस करीत आला आहे.रामायण,महाभारत युगांतील महर्षी वाल्मीकी,व्यासमुनी,द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्यांना सर्वोत्तम करण्यात आपल्या जिविताची धन्यता मानली.ज्ञानदेवांपासून तुकाराम ,रामदास आदि संतांनी लोकशिक्षणाचे,लोकोद्धाराचे महान कार्य हाती घेवून समाजोद्धार घडवून आणला.ख-या अर्थाने ते या समाजाचे शिक्षक होते.
          आपल्या अभ्यासविषयात तन-मनाने रममाण होणारा,विद्यार्थी घडविण्यात आपल्या जीवनाची सार्थकता मानणारा आदर्श शिक्षक स्वातंत्र्यपूर्वकाळापासून या भारतभूमीत आपणांस पहावयास मिळतात.गुरुदेव रविंद्रनाथ टागोर,साने गुरुजी,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,कर्मवीर भाऊराव,डॉ.बापूजी साळुंखे, गो.ग.आगरकर,प्रा.ना.सी.फडके,आचार्य अत्रे,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,श्री.म.माटे,पु.ग.सहत्रबुद्धे, वाडिया काँलेजचे आर.सदाशिव अय्यर,प्रा.ग.प्र.प्रधान,फ़र्ग्युसनचे दे.द.वाडेकर,राजारामचे प्राचार्य गोकाक, जे.पी.नाईक,लिलाताई पाटील,डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम,डॉ.माशेलकर,प्राचार्य शिवाजीराव भोसले अशा शिक्षकांनी शिक्षणातील अध्यापनाचा वसा,वारसा जणू विद्यादेवता सरस्वतीमातेकडून घेतला होता.ज्ञानमंदिरात देहभान हरपून,जिवाचे रान करून ,प्रचंड विद्वतेचा कस लावत या गुरुंच्या वाणीतून ज्ञानाचे मधुघट अक्षरश: ओसंडून वाहत असत.या त्यांच्या ज्ञानसरींत अखंड भिजत रहावे असे विद्यार्जन करणा-या शिष्यास वाटत असे.त्यांच्या वाणीतील प्रत्येक शब्द त्यांच्या विद्वत्तेची,व्यासंगतेची पुरेपुर साक्ष देत असे.'निष्काम कर्म' या भावानेतुन हे हाडाचे शिक्षक कार्यरत होते.आई जशी मुलाला कर्तव्य म्हणून संभाळते,मुलाने मोठे व्हावे,त्याने मिळवते होवून आपले काम करावे अशी अभिलाषा तिच्या मनी कदापि नसते. 'कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'याप्रमाणे जशी माऊली मुलाचे करते तद्वतच हे शिक्षक आपले योगदान देत असत.आपल्या मनात ज्ञानाची ज्योत सदैव तेवत ठेवणारे,औपचारिकतेच्या पलिकडे जाऊन कार्य करणारे,स्वतः आहोरात्र तेवत राहून ज्ञानप्रकाशाचे दान करणारे,प्रखर बुद्धिवादी तितकेच भावनिक हे गुरुवर्य होते.
                     विद्यार्थ्यांच्या ओढीने अखंड विद्यार्जन करणारे नि या विद्येचे संपूर्णपणे दान करणा-या या गुरुवर्यांचे पगारही बेताचेच असत.उलट शिष्याच्या जिवनोन्नतीकरिता पगारापेक्षा जास्त स्वतः खर्च करणारे गुरुवर्य पूर्वीच्या काळी होते हे आपणांस त्यागाची धगधगती मशाल असलेल्या कर्मवीर भाऊरावांच्या उदाहरणावरून दिसते.आण्णा आणि लक्ष्मीबाई यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यज्ञकुंडात आपल्या प्रपंचाची आहुती दिली.नोकरीत आण्णांना 300 रुपये प्राप्ति होत असे.त्यावेळी सोन्याचा भाव 20 रुपये प्रती तोळा होता.त्यावेळी आण्णांनी शासनाने देऊ केलेले 300 रुपये वेतन नाकारले इतकेच नव्हे तर लक्ष्मीबाईंच्या 90 तोळे सोने नि मंगळसुत्राची आहुती त्यांनी आपल्या विद्यार्थी प्रेमापोटी दिली.महात्मा गांधींनी शिक्षकाला मातारूपी शिक्षक असे संबोधले.शिक्षक आपली निष्ठा समर्पित भावनेने देतो.अशा समर्पणाची किंमत पैशात करता येत नाही.'निष्ठेला मोल नाही,ते एक मुल्य आहे'असे ते म्हणाले.शिक्षक हा अतिश्रेष्ठ हे शिक्षकाच्या बाबतीत महात्मा गांधींनी काढलेले उद्गार पुरेसे बोलके आहेत.
                  आजकाल मात्र गुणपत्रिकेवरील गुणांच्या जंजाळात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही तसाच जिथे-तिथे दिसत आहे.गुणवत्तेची कृत्रिम चाळणी हातात घेवून विद्यार्थ्यांना या शिक्षकांद्वारे निवडले जात आहे.पूर्वीच्या काळातील ज्ञानतपस्वी शिक्षकांप्रमाणे स्वतःला ज्ञानयज्ञात तावून सुलाखून काढणारे शिक्षक आज अपवादानेच पहायला मिळतात.घंटेचे टोल,पगाराची तारीख,वेतन आयोग,नेहमीच्या सुट्ट्या ,हक्काची रजा,गावातील राजकारण,शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा इतर आपल्या सोयीच्या मागण्यांसाठी झटणा-या शिक्षक संघटनांच्या वर्तुळात आजचा बहुतेक शिक्षक व्यस्त आहे.सामाजिक उत्तरदायित्वाच्या कार्यास 'अशैक्षणिक काम' असे गोंडस नाव देत त्यापासून पळ काढणारे आजचे शिक्षक कर्मवीरांप्रमाणे संसाराची आहुती तर दूरच पण आहे त्या वेळेतही पेशाशी प्रामाणिक राहत कार्य करताना मनाने उदासीन जाणवतात.मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे.आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरीक आहे.त्याचा आजचा वर्तमान उजळला तरच उद्याचे भारताचे भविष्य उजळेल याचे भान कोठेच उरलेले नाही.ज्यांच्या मनात साने गुरुजींचे ममत्व असायला हवे असे गुरुजी अपवादाने दिसून येतात.मी वर उल्लेखलेल्या गुरुवार्यांइतका किंबहूना त्याचा जवळपास जाईल इतका व्यासंग आजच्या शिक्षकांत विरळच.पुर्वीच्या शिक्षकांच्या ज्ञान,चारित्र्य,व्यक्तिमत्व,आचार-विचारांचा मोठा दबदबा वाटत असे.ही व्यासंगी नि आचारनिष्ठ मंडळी मोठ्या उर्जेने,निष्ठेने,निर्धाराने ज्ञानदानाचे कार्य करीत असे.पण आता तसे फारसे दिसत नाही.कोवळ्या संस्कारक्षम मनांना सुयोग्य वळण देणारा,घडविणारा शिक्षक हा सर्वांगाने सुज्ञ,स्वतंत्र,स्वाभिमानी,चारित्र्यवान,सदैव ज्ञानाग्राही असला पाहीजे.पण आज भौतिक सुखाच्या मागे धावणा-या,समाज उन्नतीस बाधक राजकारण,ज्ञानदानाव्यतिरिक्त पूरक व्यवसायात गुंतलेल्या आजच्या शिक्षकाने सरस्वतीला पराधीन केल्याचे जाणवते.
       असे असुनही वाळवंटात ओअसिस असावे नि त्याच्या शोधार्थ भटकणा-या पथिकास सुखावह वाटावे तसे आजच्या शिक्षकांत अनेक ठिकाणी असे ओअसिस असल्याचेही आढळते.अनेक शाळांमधून ज्ञानाच यज्ञ पूर्वीच्या गुरुवर्यांप्रमाणे तेवत ठेवणारे गुरुजन भेटीस पडतात.या त्यांच्या ज्ञानयज्ञाच्या तेजाने दशदिशा उजळतील नि भविष्यात सर्वच शिक्षक या ज्ञानयज्ञात सर्वस्वाची आहुती देण्यास सिद्ध होतील असा सार्थ विश्वास मला वाटतो.अखेरीस कालच्या नि आजच्या शिक्षकांबद्दल मला म्हणावेसे वाटते,'दिव्यत्वाची जेथे प्रचिती,तेथे कर माझे जुळती!'

--------लेखन:- श्री.सुनील विलास अस्वले,वि.मं.पोहाळे/आळते,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर.(सुवर्णविलास 9049211785)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा