स्वच्छतेचे महत्त्व

मध्यंतरी माझ्या पाहण्यात एक चित्र आले. विशिष्ट ठिकाणी कोणाची उपस्थिती होती हे दर्शवणा-या या चित्रात एका बाजुला प्राण्यांच्या पावलांचे ठसे तर दुस-या बाजुला भरपूर कचरा होता.जेथे कचरा होता त्या चित्राखाली माणूस असा उल्लेख केला होता. मानवी मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे हे चित्र स्वच्छतेबद्दल आपण किती जागरूक आहोत हे स्पष्ट करत होते.स्वछता ही जशी वैयक्तिक आचरणाची बाब आहे तशीच ती सार्वजनिक ही आहे. आंतरिक मनाची नि बाह्य अंगाची तसेच समाजजीवन शुद्ध करणारी स्वच्छता असे तिचे अनेकविध प्रकार पडतात.
         मूलत: निसर्गनिर्मित या भूतलावावरील कोणतीही गोष्ट नितांत सुंदर आहे.पण जिथे-जिथे माणूस पोहचला तिथे -तिथे त्याने आपल्या आचरणाने या सौंदर्याला बाधा पोहचवल्याचे आपणांस दिसून येते.झ-याच्या रूपाने निर्माण होऊन वाटेतील असंख्य जीवांची जीवनदायी असणारी  खळखळ वाहत  सागराकडे धावणा-या सरितेला आपल्या स्वार्थाने अशुद्ध करणारा माणूस सामाजिक जीवनाला,आरोग्याला  सातत्याने बाधा पोहचवत आहे. आपल्या वर्तमान भौतिक सुखासाठी मनुष्यप्राणी भू,जल,वायू या निसर्गाच्या सर्वांगाला अस्वच्छतेचा विळखा घालून स्वतःचाच -हास  नि भविष्याचा विनाश घडवत आहे.
                 वातावणातील या अस्वच्छतेचा परिणाम मानवाच्या शरीराप्रमाणेच त्याच्या मनावरही होत आहे.प्रदूषित जल,वायू मनुष्यात शारीरिक विकार निर्माण करण्यास कारणीभुत ठरत आहेतच पण त्याचबरोबर मानसिक आजारासही कारणीभुत ठरत आहेत हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.मानसिक निराशा हे एक त्याचे प्रातनिधिक उदाहरण देता येते. या सर्व गोष्टिंपासून मुक्ति मिळवून प्रसन्न आयुष्य जगायचे असेल तर स्वच्छतेचे आचरण हाच त्यावरील एकमात्र उपाय आहे.
---सुवर्णविलास.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा