शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

माणसं बदलतात...(स्वरचित शब्दरचना)

माणसं बदलतात...

आपलेपणाचे मुखवटे घालून
नफ्याची बेरीज  करताना
तोट्याची वजाबाकी होऊ लागताच
माणसं बदलतात...

रंग घेऊन सरड्याचे 
अवती भवती वावरताना
एक दिवस अचानक
खरा रंग उघडा पडताच
माणसं बदलतात...

खांद्यावर हात ठेवून फिरणारी
बहुरुप्याचे सोंग घेणारी
ढोंगीपणा उघड होताच
सावध होऊन स्वतःसाठी
माणसं बदलतात..

स्वार्थासाठी गोड बोलणारी
सर्वांचाच जयजयकार करणारी
मतलबी होऊन वावरणारी
मुखवटे गळून पडताच
माणसं बदलतात..


फसवी असतात आपुलकीची नाती
ओठात एक अन पोटात एक
असते फक्त स्वार्थासाठी
सावध राहावे अनंत या जगती
कारण माणसं बदलतात...

✍🏻 © सुवर्णविलास

रविवार, १ जून, २०२५

अपयश स्विकारता यायला हवं...

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव करून विश्वविजेता डी गुकेशने अखेर त्याचा बदला घेतला. नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्नस कार्लसनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या छायेत असतानाच हा विजय खेचून आणला. या विजयानंतर मात्र कार्लसने पराभवाचा राग व्यक्त केला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसने जोरात चेस टेबलवर आपला हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.जीवनात कोणत्याही क्षेत्रातील अपयश देखील खिलाडूवृत्तीने स्विकारता यायला हवे. जीवनात संयम हा सर्वात मोठा गुरू आहे अन स्वतःतील उणीव स्वीकारण्याची मानसिकता मनुष्याला प्रगतीपथावर नेऊ शकते  हा दृष्टिकोन शालेय जीवनापासूनच  अभ्यास असो ,खेळ असो वा स्पर्धा असो या प्रत्येक ठिकाणी  पालकांनी आपल्या मुलांत व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांत विकसित करायलाच हवा. अन्यथा अपयशावर मात करू न शकणारी व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाऊन स्वतःला,समाजाला किंवा व्यवस्थेला दोषी ठरवत  याविरुद्ध विघातक निर्णय घेते. विद्यार्थी आत्महत्या ,गुन्हेगारी, व्यसनाधीनता हा याचाच परिणाम म्हणता येईल. http://suvarnvilas.blogspot.com

--✍🏻 सुनिल अस्वले.(सुवर्णविलास)
पदवीधर शिक्षक -केंद्रशाळा दळवेवाडी,ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर
व्हाट्सअप्प -9049211785

सोमवार, १२ मे, २०२५

डोंगरची मैना...

#करवंद #कोल्हापूरकर #कोल्हापूरहायकर्स 
*आली डोंगरची मैना आली,आली काळी मैना आली...*
अशी आरोळी ऐकू आली की पावलं आपसूकच घराबाहेर पडत.अन नजर डोक्यावर कापडात बांधलेली बुट्टी घेऊन भर उन्हात फिरत असलेल्या ,डोंगर दऱ्यात वावरणाऱ्या, दूरवरच्या वाडी वस्तीवरून आलेल्या बाबाला नाहीतर बाईला शोधायची. त्यापैकी कुणी दिसले की 'ए बाबा' , 'ए बाई' हिकडं ये...अस म्हणून त्यांना दारात बोलवायचे. डोक्यावरची ती बुट्टी कधी एखादा खाली उतरते आणि त्यात एकमेकांना बिलगून बसलेली काळी मैना कधी खायला मिळते असं होतं असे.दारात आल्यावर उंबऱ्याजवळच डोक्यावरची बुट्टी उतरली जायची.त्या बुट्टी खाली डोक्यावर ठेवलेली रुमालाची चुंबळ काढून खाली ठेवायचे.माझं सारं लक्ष त्या बुट्टीतल्या काळ्या मैनेकडं असायचं. आई सगळ्यात आधी त्यांना पाणी घेऊन यायची कधी कधी एखादी भाकरी अन कालवण असलं तर ते पण दिलं जायचं. उन्हातान्हातून गावभर फिरत असताना कोरड पडलेल्या घशात तांब्याभर पाणी रितं व्हायचं अन मग पिळदार मिशा पुसत अन जर बाईमाणुस असलं तर डोक्यावरचा पदर नीट करत त्याच पदरानं तोंड पुसत दिलेली भाकरी खात खात कुठल्या गावचं,इथवर कसं आलासा अस बोलता बोलता कशी दिलं करवंद अशी विचारणा व्हायची..  मग कोवळ भर मक्क ,ज्वारी नाहीतर मापट भरून भात  द्यायच्या बदल्यात कोवळं भरून करवंद दिली जायची. कधी कधी या करवंदासोबत आंबट-गोड चवीचे अळू देखील असायचे.मग ते देखील घ्यायचा माझा हट्ट होत असे. एकदा का ही काळी मैना पदरी पडली की मग तिला पाण्यात खळबळून कधी खाऊ असे व्हायचे. आई मग आम्हां भावंडांना  ही करवंद वाटून द्यायची. करवंद हातात पडताच ती नीट बघून खावा ही सक्त ताकीद असायची... मग हळूहळू आंबट - गोड अशा काळ्या मैनेचा स्वाद घेतला जायचा..
 चैत्र पालवी फुटली की डोंगरदऱ्या मध्ये हिरव्यागार काटेरी झुडुपात काही कच्ची असलेली हिरवी ,पिकत असलेली लाल आणि पिकून तोंडाला पाणी आणणारी गर्द काळी करवंद म्हणजेच भर उन्हात डोंगरात निसर्गानं पिकवलेलं एक अप्रतिम सौदर्यच.. ज्या त्या ऋतूत बहरणारा हा रानमेवा मानवासाठी निसर्गानं दिलेलं वरदानच आहे.त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदात लोहाचं प्रमाण  मुबलक असतं म्हणून शरीरातील पाण्याचं होणारं जास्तीच उत्सर्जन आणि शरीराचं तापमान यांचा समतोल ठेवण्यासाठी करवंद खावीच.

डोंगरदऱ्यात ,वाडीवस्तीवर  राहणाऱ्या ,काबाडकष्ट करणाऱ्या माणसांच्या उदरनिर्वाहाचं रानमेवा विक्री हे एक महत्वाचं साधन होय. याकरिता आपल्या कुटुंबातील बारीकसारीक  पोराबळांना सोबतीला घेऊन  करवंदाच्या जाळ्या  धुंडाळत अख्खा डोंगर पालथा घालायचा.तोडता तोडता चिकट झालेली बोट ,अन एखादं करवंद तोंडात टाकत सूर्य डोक्यावर कधी येतो हे देखील कळत नाही. अन मग तिथून पुन्हा प्रवास सुरु गावागावात आरोळी देत..,आली डोंगरची मैना आली,आली काळी मैना आली...

अलीकडे हा रानमेवा गावोगावी फिरून विकणारी पिढी कमी होताना दिसत आहे..'आताची पोरं कुठं जात्यात बाबा करवंद काढायला', हे गावोगावी पायी चालत येणाऱ्या या जुन्या लोकांच्या तोंडचं वाक्य हा रानमेवा भविष्यात दुर्मिळ होईल हेच दर्शवते.
कोल्हापूर हायकर्स च्या वतीने आयोजित पावनखिंड भ्रमंती वेळेस या रानमेव्याचा प्रत्यक्ष डोंगर दऱ्यात जाऊन आस्वाद घेताना लहानपण डोळ्यासमोर तरळून गेले. त्यातूनच हे शब्दांकन...😊

✍🏻 सुनिल सुवर्णा विलास अस्वले.(सुवर्णविलास)
व्हाट्सअप्प -9049211785

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

असे ज्याची इच्छा दांडगी, मार्ग तयाला मिळती सत्तर...

*'असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर....'*

ऐतिहासिक मसाई पठाराच्या कुशीत, डोंगर कपारीत वसलेलं म्हाळुंगे तर्फ ठाणे. पायथ्यावरून एखाद्या नवख्या माणसास या डोंगरकपारीत गाव आहे, असे सांगितले तर त्याचा विश्‍वासच बसणार नाही. आजपर्यंत या गावात कधी एसटी बस गेली नाही.
ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्‍चिमेला विस्तीर्ण मसाई पठाराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे म्हाळुंगे तर्फ ठाणे छोटेखानी गाव. पन्हाळगडाला दिलेल्या सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका करून घेण्यासाठी जो खुश्‍कीचा मार्ग अवलंबला तो शिवकालीन मार्गही याच गावातून जातो. अवघ्या 60 घरांचे अन 345 लोकवस्ती असलेले एकाच गल्लीचे छोट्याश्या या गावात *दळवेवाडी केंद्रातील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील विद्या मंदिर म्हाळुंगे/ठाणे शाळेत इ.१ ली ते ४ थी चे जवळपास 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक श्री.गोविंदराव बच्चे व अध्यापक श्री.तिरुपती मुसळे हे गुरुवर्य नियमितपणे शाळेत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शालेय व सहशालेय,अभ्यासपूरक   उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना गावकऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.*नुकतेच गावातील दानशूर व्यक्तींनी शाळेला संगणक,प्रोजेक्टर, फर्निचर प्रदान करून दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.*
 
      *याच शाळेतील तंत्रस्नेही असणारे,शासनाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे ,सेवेशी प्रामाणिक,कालसुसंगत असणारे आदरणीय गुरुवर्य श्री.तिरुपती मुसळे सर यांनी आज निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत निपुण App मध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर नोंदविण्यासाठी केलेल्या अविरत प्रयत्नांना नक्कीच सलाम करावासा वाटतो. शाळेत नेटवर्क ची समस्या बारमाही आहे.पण  'असे दांडगी इच्छा ज्याची,मार्ग तयाला मिळती सत्तर....' या उक्तीनुसार विद्यार्थी गुणवत्तेसाठी धडपडणाऱ्या या गुरुजींनी शाळेपासून जवळपास 400 मीटर अंतरावर जिथे नेटवर्क उपलब्ध होते तिथे विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन स्तर नोंदणी केली.* 

*जेव्हा इच्छा ज्वलंत होते तेव्हा ती गोष्ट साध्य होतेच. आज मुसळे सरांच्या या कृतीतून हेच दिसून आले.* 

*शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मा.गटशिक्षणाधिकारी श्री.संदीप यादव, मा.शा.पो.अधीक्षक श्री.शिवाजी मानकर,मा.केंद्रप्रमुख श्री.कैलास वसावे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.*

शाळेचे मुख्याध्यापक श्री.बच्चे सर व अध्यापक श्री.मुसळे सर यांच्या शैक्षणिक कार्यास अखंड हार्दिक शुभेच्छा!👌👌👍👍💐💐

शब्दांकन - श्री.सुनिल अस्वले, पदवीधर शिक्षक -केंद्रशाळा दळवेवाडी.