बुधवार, ४ जानेवारी, २०२३

माणुसकीचे दर्शन

माणुसकीचे दर्शन 

रविवार दि.1 जानेवारी 2023 -नव्या वर्षाच्या स्वागताचा दिवस..या दिवशी मी माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या कॉलेजवर सोडायला पुण्याला गेलो होतो.सकाळी लवकर जाऊन पुन्हा लवकर माघारी यायचे असे नियोजन करून बाहेर पडलो..प्रवास लाल परीनेच.. डॉ.डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज ,आकुर्डी पुणे इथपर्यंत पोहचायला सायंकाळचे 5 वाजलेच..हॉस्टेल वर पोहचून थोडे फ्रेश होऊन मग माघारी निघायचे म्हणून सायं.7 वा.बाहेर पडलो..वाटेत मी आणि मुलगा स्टँड पर्यंत जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो.बऱ्याच वेळाने एक रिक्षा मिळाली.त्यांना मी निगडी बस स्टँडवर सोडण्याची विनंती केली..पण त्यांनी मला आधी कुठे जायचंय तुम्हाला हे विचारले.मी मला कोल्हापूर ला जयचेय सांगितले. त्यावर त्या रिक्षा चालकाने मला निगडी कशाला जाता?ते तुम्हांला उलट पडते,त्यापेक्षा मी तुम्हांला सोडतो तिथून जावा,तुम्हांला तिथे मुंबईवरून दर पाच मिनिटाला येणाऱ्या एस टी बसेस मिळतील असे सांगितले. त्यांचे ते शब्द ऐकून मी त्यांना भाड्याबद्दल चौकशी केली..तर त्यांनी ओला चा जो दर आहे तोच द्या..असे मला सांगितले.पुण्यात बहुतेक वेळा जास्त पैसे घेतले जातात हा अनुभव होता पण या रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा मला भावला. रिक्षात बसताना माझ्या मुलाने माझी गळाभेट घेतली तेव्हा माझे व त्याचेही डोळे काही क्षण पाणावले हे पाहून तो रिक्षा चालक देखील भावूक झाला.रिक्षा सुरू करून मार्गस्थ होताना त्याने माझी व मुलाची आपुलकीने चौकशी केली अन काही काळजी करू नका मी इथेच कॉलेजच्या पाठीमागे राहतो..तुम्ही केव्हाही आलात किंवा तुमच्या मुलाला कुठलीही अडचण आली तर मला फोन करा..मी असेल तिथून येईन तुमच्या मदतीला हे सांगून मला अतिशय मोलाचा धीर दिला. त्या रिक्षा चालकाने आपला मोबाईल नंबर देऊन तो माझ्या मुलास देखील देऊन ठेवा म्हणून सांगितले. पूर्ण प्रवासात या रिक्षाचालकाने मला शाब्दिक बळ दिले अन मुलाच्या काळजी पासून दूर राहण्यास सांगितले.*मैं हु ना* असेच जणू काही त्याने मला सांगून ठेवले. मला कोल्हापूर एस.टी मिळेल आशा ठिकाणी सोडून दुसरे भाडे घेऊन रिक्षाचालक निघून गेला.निरोप घेताना या रिक्षाचालकाच्या पायांना स्पर्श करण्यास मी विसरलो नाही.त्यानंतर मी एस.टी येण्याची वाट पाहत उभा राहिलो..जवळपास अर्ध्यातासाने त्याच रिक्षाचालकाने मला फोन करून एस.टी. मिळाली का म्हणून चौकशी केली.त्याच्या या आपुलकीने मी आणखीनच भारावून गेलो. तेव्हा मला एस.टी.मिळाली नव्हती..पण जेव्हा मला एस.टी मिळाली(सायं.8.30 वा.) तोपर्यंत या रिक्षाचालकाने मला तीन वेळा फोन करून विचारणा केली.अखेरीस एस.टी. मिळाली असे कळवल्यावर पोहचल्यावर फोन करा सांगून या रिक्षाचालकाने माझा निरोप घेतला. माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी हा न भूतो, न भविष्यतो असाच अनुभव होता. हे माणुसकीचे दर्शन घडवणारा किंबहुना अर्थात माणसातील देवत्वाचे दर्शन घडविणारे हे रिक्षाचालक मामा होते पवार मामा...खरेतर अशा मनाने निर्मळ,प्रामाणिक,संवेदनशील माणसांच्या अस्तित्वामुळेच ही दुनिया तग धरून आहे ही मनाला जाणीव झाली.माणुसकीचा खरा अर्थ अशा लोकांना पाहिले की कळतो. पुस्तकी शिक्षणाने स्वतःला शहाणे समजणाऱ्या  समाजातील लोकांपेक्षा माणूस वाचून माणुसकी जगवणाऱ्या अशा लोकांचा मला नेहमीच आदर आहे. आशा अवलिया व्यक्तिमत्वास माझे मनापासून धन्यवाद... पवार मामा आपणांस उदंड ,निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना!🙏🌹

✍️©सुवर्णविलास ९०४९२११७८५ दि.02/01/2023