रविवार, २९ डिसेंबर, २०२४

साक्षरता गीत

चला चला रे सारे या
नवभारत साक्षरता घडवूया

मिळून सारे साक्षर आपण
निरक्षर सारे शिकवूया

चला चला रे सारे या
नवभारत साक्षरता घडवूया...

अज्ञानी जन ते ज्ञानी करण्या
साक्षरता कार्यक्रम चालवूया...

चला चला रे सारे या
नवभारत साक्षरता घडवूया...

शिकवू वाचायला ,लिहायला त्यांना 
सज्ञान आपण करूया त्यांना 

चला चला रे सारे या
नवभारत साक्षरता घडवूया...

निरक्षर ना ठेवू कुणा
साक्षर सारे करूया...

चला चला रे सारे या
नवभारत साक्षरता घडवूया...

✍🏻 सुनिल विलास अस्वले
पदवीधर शिक्षक -केंद्रशाळा दळवेवाडी ,ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर.
Whatsapp 9049211785

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४

माझे कार्य -माझी प्रेरणा

कुलदेवता श्री जोतिबा च्या आशीर्वादाने 13 वर्षांपूर्वी (01/12/2011) जोतिबा डोंगर,ता.पन्हाळा शाळेतून विद्या मंदिर पोहाळे/आळते,ता पन्हाळा  शाळेत  पदोन्नतीने पात्र पदवीधर शिक्षक पदावर रुजू झालो. हा शैक्षणिक प्रवास तसा आव्हानात्मक होता पण पालकांचा विश्वास ,उपक्रमशीलता,कालसुसंगतता यामुळे हा प्रवास आनंददायी व ऊर्जावान ठरला.आज केंद्रशाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा शाळेत कार्यरत असताना या पदावरील 13 वर्षांची कारकीर्द निर्विघ्नपणे पूर्तता झाली.या कालावधीत गेली 5 वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात कोणताही अडथळा न येता दळवेवाडी, केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार पार पडण्याची व त्यातून प्रशासकीय कामकाज शिकण्याची  संधी मला मिळाली. या भूमिकेत माझ्या या केंद्रातील सर्व गुरुवर्य शिक्षक बंधू -भगिनी,मित्र परिवाराचे अमूल्य सहकार्य,विश्वास व पाठबळ मला लाभले व लाभत आहे.सेवेशी सतत  प्रामाणिक राहून केलेल्या कार्याचे फलित अनेक विद्यार्थ्यांच्या यशातून प्राप्त होत असतानाच अनेक संस्थांनी 2019 पासून  आदर्श शिक्षक म्हणून कार्याचा गौरव केला. प्रशासनाने देखील शैक्षणिक कार्याची दखल घेत ऋग्वेद आदर्श शिक्षक- २०२३-२४ या मानाच्या पुरस्कारासाठी मला पात्र ठरवले.यंदा २०२४-२५ साठी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराचे तालुका स्तर सर्व निकष पार पाडून जिल्हा स्तरावर मुलाखती पर्यंतचा प्रवास निश्चितपणे सुखावणारा आणि पुढील शैक्षणिक कार्यास अधिक प्रेरणा अन बळ देणारा आहे. या प्रवासात मला लाभलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व  कार्याशी प्रामाणिक असलेले सर्व सहकारी गुरुवर्य,कार्याची प्रेरणा देणारे प्रशासनात लाभलेले सर्व अधिकारी , कर्मचारी वर्ग  या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला आकार मिळाला ते माझे दैवत माझे आई -पप्पा(सुवर्णविलास),माझी भावंडे ,जिचा मला परीसस्पर्श लाभला ती माझी पत्नी, माझी मुले या सर्वाचे मनस्वी धन्यवाद!आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अन आशीर्वादाने निर्विघ्नपणे एकंदरीत केंद्रशाळा कोलोली ,ता.पन्हाळा येथून 2000 साली  सुरू  झालेला हा 25 वर्षाचा (Silver Jubilee) सेवा कालावधी आनंददायी पार पडत आहे. अशीच साथ लाभो हीच मनोकामना! सर्वांच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद हीच माझी कार्यप्रेरणा!🙏🙏

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

वडणगेची साखर परंपरा

माझा गाव वडणगे,ता.करवीर ची साखर  परंपरा (जागर उत्सव)

कोल्हापूर शहराच्या उत्तरेस ,पंचगंगा नदीच्या काठी वसलेले,कोल्हापूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणारे, करवीर काशी म्हणून ओळखल्या जाणारे, भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या वास्तव्याने पावन झालेली धरती, जिथे शिव व पार्वतीची स्वतंत्र मंदिरे पाहायला मिळतात असे एकमेव गाव असणारे माझे वडणगे गाव.  गावाच्या मुख्य चौकामध्ये माता पार्वती देवीचे मंदिर आहे.शारदीय नवरात्र उत्सव व महाशिवरात्री हे उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरे होतात.पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे शिवपार्वतीच्या दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्र उत्सवात नऊ दिवस ग्रामदैवत माता पार्वतीची वेगवेळ्या रुपात पूजा बांधली जाते. अष्टमीला देवीचा जागर करण्याची पूर्वापार चालत आलेली अनोखी परंपरा गावाने  आजही जपली आहे. या परंपरेनुसार अष्टमीच्या रात्री देवीचा जागर केला जातो.साखरेने भरलेली एक मोठी परात, त्याचसोबत माता पार्वती देवीसाठी साडी-चोळी ,हार-फुले घेऊन ती पहाटे देवीला सवाद्य मिरवणुकीने,वाजतगाजत  अर्पण केली जाते त्यास साखर म्हणून संबोधले जाते. ही एक अनोखी पद्धत फक्त याच गावात दिसून येते. जागरादिवशी महाराष्ट्र व कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्हयातील प्रसिद्ध ब्रास बँड कंपनीची  बँड पथके गावातील प्रत्येक गल्लीत आमंत्रित केली जातात. सायंकाळी साधारणपणे सात ते आठ वाजता जवळपास अकरा गल्लीतील शेवटच्या टोकापासून या बँड पथकाच्या सादरीकरणाची सुरुवात होते.घेऊन रात्रभर ही बँडपथक विविध गाण्यांचे सुरेल सादरीकरण करतात. अनेकदा काही गल्लीत ट्रॅक्टरवर वेगवेगळ्या देखाव्यांचे देखील सादरीकरण केले जाते.  हे सर्व दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत न थांबता सुरू असते. दुसरे दिवशी साधारणपणे सकाळी सहा ते सात वाजता सर्व गल्लीतील ही निमंत्रित बँडपथके मुख्य चौकात एकत्रित येतात व तिथे यांची जुगलबंदी सुरू राहते. प्रत्येक बँडपथक आपले सर्वोत्तम दाखवण्याचा प्रयत्न करतात. भक्तीसोहळ्यात न्हाऊन गेलेल्या या नऊ दिवसांवर या जागर सोहळ्याने साज चढतो. गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण या साखरेत तल्लीन होऊन सहभागी होतात. विशेषतः गावातील ज्येष्ठांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही अनोखी व एकमेव गावात असणारी परंपरा गावातील सध्याचे तरुण जपत आहेत. 

 शिवपार्वती हर हर महादेव!🙏🙏🙏🙏🙏

सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभकामना!

✍️ सुनिल अस्वले(सुवर्णविलास)

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा....

🌺 *बाप्पा निघाले...*🌺

हो,आज माझे बाप्पा निघाले...
यानिमित्ताने का होईना
पुन्हा लहान होता येतं का ते बघितलं

*एक-दोन-तीन -चार गणपतीचा जयजयकार*

*अर्धी भाकरी कुणाची*
*गणपतीच्या मुलाची*

*गणपती गेले* *गावाला*
*चैन पडेना आम्हांला*

*गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या...*

असं म्हणत सारख सारख बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत विसर्जनाकरीता *जड झालेली पावलं* तलावाच्या दिशेनं जायची

*खरतर मन भरून यायचं*
वाटायचं नको सोडायला बाप्पाला पाण्यात..
पण मोठी माणसं थोडीच ऐकणार होती?
आणि मग कसतरीच वाटायचं घरी परतल्यावर...
बाप्पाची ती जागा पाहवत नसायची

मन अक्षरशः रडत असायचं...

बाप्पा तुझ्या आगमनाची आतुरता नि तुझ्या सोबत असण्याचा आनंद जितका असायचा,
आतांच्यासारखा उत्साह तुझ्या जाण्याचा कधीच नसायचा...

 
🌺 *बाप्पा आज जाताय तर इतकंच मागणं आहे...*🌺

*परतून दे हेच* *दिवस,*
*जागवून जा याच संवेदना....*

*वयानं मोठं करून हरवलेलं अल्लड बालपण देऊन जा...*

*भौतिक सुखाच्या मोहात हरवलेलं शरीराचं स्वास्थ देऊन जा...*

*सुखाच्या माग  धाववणाऱ्या या मनाला*
*समाधानाचा पाश आवळून जा...*

*गर्दीत असूनही एकटं असणाऱ्या  मनाला*
*गर्दीचं भान देऊन जा...*

*मी पणाची बाधा झालेल्या मनाला*
*आपले पण देऊन जा...*

*स्वतःच्याच करुणेत रमलेल्या जाणिवेला*
*इतरांचे कारुण्यविचार देऊन जा...*

*यंत्रवत या जीवनाला*
*खरेखुरे जगण्याचा श्वास देऊन जा...*

*बाप्पा जाता जाता* 
*मजसाठी इतकं सार करून जा...*

*गणपती बाप्पा मोरया..*
*पुढच्या वर्षी लवकर या...*

✍© *सुवर्णविलास*

दि.17/09/2018

*www.suvarnvilas.blogspot.com*