आठवणीतील काही.....
*साखरेची माळ*
नुकताच गुढीपाडवा साजरा झाला...पहाटे लवकर उठून दारात गुढी उभा करण्याची माझी लगबग सुरू झाली.आदल्यादिवशीच बाजारातून विकत आणलेल्या काठीला पाण्याने स्वच्छ करून वस्त्र बांधले.त्यावर कलश घातला.कडूलिंबाचा डहाळा,चाफ्याच्या फुलांची माळ बांधली .या सजवलेल्या गुढीला साखरेची माळ बांधायला घेतली अन मन बालपणाच्या आठवणीत रमले.
आम्ही लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबाची गुढी घराच्या समोर असलेल्या काळ्या दगडी फरशांच्या चौकात दिमाखात उभी राहायची.आदल्याच दिवशी परसात ज्याला आम्ही परडे म्हणत असू तिथे आमची बांबूची बेटं होती अन आजही आहेत. त्या बेटांतून एक सरळ ,उंच चिवा निवडून तो तोडून आणून ठेवलेला असायचा. गुढीपाडाव्याच्या दिवशी घरातील मोठी माणसे जसे की माझे चुलते,पप्पा विधिवत पूजा करून ही गुढी उभा करायचे. या सगळ्यात मात्र आमची नजर एकाच गोष्टीवर स्थिरावलेली असायची अन ती म्हणजे या गुढीला बांधलेली रंगीत साखरेची माळ..
खरंतर गुढीपाडवा सणाची चाहुलच गावातील दुकानां-दुकांनामधून लाल,केशरी,पिवळ्या, पांढऱ्या आशा विविध रंगातील साखरेच्या माळा पाहूनच व्हायची. त्या रंगबेरंगी माळा पाहून कधी एखादा गुढीपाडवा येतो नी या माळेतील ती साखरेची गाठ तोंडात पडते असे व्हायचे.घरात आदल्यादिवशी कागदाच्या पुडीत बांधून आणून ठेवलेल्या त्या साखरेच्या माळेकडे आमचे नित्य लक्ष असायचे. सणाच्या दिवशी गुढीला बांधलेल्या त्या माळेला आम्ही एखाद्या पहारेकऱ्यांसारखे लक्ष ठेवून असायचो.सायंकाळी चार -पाच वाजयच्या सुमारास गुढी उतरली जायची आणि दिवसभर गुढीला बांधून ठेवलेल्या त्या साखरेच्या माळेतील गाठींचा प्रसाद आम्हां लहान मुलांना वाटला जायचा.पण कधी कधी ही माळ खाण्याचा मोह इतका व्हायचा की दुपारी घरातील सगळी मोठी माणसे वामकुक्षी घेत असलेले पाहून आमच्यातील एकजण दबक्या पावलांनी छतावर चढून साखरेच्या माळेतील एखादी गाठ काढण्याचा प्रयत्न करायचा..पण मनात मात्र घरातले कोणीतरी जागे होईल अशी भीती असायची म्हणून घाईगडबडीत माळ काढण्याच्या नादात एखादे कौल फुटायचे नि त्या आवाजाने घरातील माणसे जागे होऊन बाहेर यायचीत.आम्ही खाली उभे असणारी छतावर चढलेल्या शिलेदाराचे मावळे तिथून धूम ठोकत असू पण छतावरच्या शिलेदाराला अलगद खाली यायला लावून फुकटचा प्रसाद दिला जायचा.
मग काहीवेळासाठी ही मोहीम तहकूब व्हायची.पण मन मात्र स्वस्थ बसू देत नसायचे. आता यावेळी ही मोहीम पुन्हा हाती घेतली जायची पण यावेळी सोबतीला मित्रदेखील असायचे. सकाळच्या पुरणपोळीच्या जेवणानंतर दुपारी भर उन्हात आजूबाजूच्या सगळ्या घरातील माणसे वामकुक्षी घ्यायचे.आमच्या घरासमोरच्या हनुमानाचे मंदिर ,महसूल चावडीला देखील गुढी बांधली जायची.सुट्टीचा दिवस असल्याने ही महसूल चावडी बंद असायची. आणि ही संधी साधून आम्हां मंडळीचे हातात एक उंच काठी घेऊन येथील गुढीच्या साखर माळा काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू व्हायचे. या नादात कधी कधी या गुढी वरचा तांब्या,पेला (कलश) खाली पडायचा नि त्या आवाजाने पुन्हा आसपासच्या घरातली माणसे,महसूल चवडीचा कोतवाल शिवामामा हे सगळे रागारागानेच तोंडात शब्दांचे विषारी बाण घेऊनच बाहेर यायचीत पण तेवढ्या वेळात आमची पांगापांग व्हायची.
पाडव्याच्या सणादिवशी भर उन्हातून आमचं हे असं बाहेर भटकणं सुरूच असायचं. आमच्या या आगाऊपणाने साखरेची माळ कधीतरी मिळायची पण आसपासच्या घरातल्या मोठ्या माणसांची शब्दफुले अन घरातल्या माणसांचा पाठीवर प्रसाद मात्र नक्की मिळायचा.आजही या सणाच्या दिवशी हा बालपणीचा खोडकर पण सुखाचा काळ हमखास आठवतो.😊
✍🏻 सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com