*बालपण*
एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून
उगी उगी रूसायचं
तोंडाचा चंबू करून
दिवसभर बसायचं.
शाळेच्याच दिवशी
आजारी पडायचं
पोटात दुखतयं
हेच दुखणं असायचं.
घरी राहून दिवसभर
नुसता दंगा करायचा
आईच्याच भोवतीनं
दिवस सारा जयाचा.
लपाछपी,सूर-पारंब्या,
विटी-दांडूचा खेळ भारी रंगायचा
आबिधाबिच्या खेळात मात्र
जीव मेटाकुटीला यायचा.
झाडांवर सरसर चढून
ऎट सर्वांना दाखवायची
चिंचा,कै-या,आवळे,पेरू
जांभळे,करवंदे मनसोक्त खायाची.
मित्रांसोबत मजेत
गावभर हिंडायचे
अंधार पडताच
सुसाट घर गाठायचे.
सायंसमयी दिप लावुनी देवापुढती
शुभंकरोति म्हणायची
पाढे,कविता,प्रश्न-उत्तरे
उजळणी सा-याची करायची.
चमचमीत भाजी,चुलीवरची भाकरी,
मऊ-मऊ दूध -भात खायाचे
आकाशातील ता-यांशी गप्पा मारत
अंगणातच झोपी जायाचे.
एकचि वरदान मला देगा देवा
आयुष्य पुन्हा असेच जगायचे
बालपणीचा काळ तो सुखाचा
पुन्हा-पुन्हा मला अनुभावयाचे.
*-------स्वलिखित*
© *सु*वर्ण *वि*लास *4*
suvarnvilas.blogspot.com
sunilaswale80@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा