सांगा कसं जगायचं...??
आज घड्याळात पूर्वीइतकाच वेळ आहे. पूर्वीप्रमाणेच दिवस-रात्रीचे मिळून 24 तास आहेत.पण तरीही वेळ पुरत नाही या कारणास्तव माणसाची धावपळ सुरू आहे.पूर्वी मात्र सगळं कसं निवांत असायचं.
आता इतकीच किंबहुना आतापेक्षा जास्त कामं घरातील अनेकजण मिळून पार पाडत असत.आतासारख्या तंत्रज्ञान ,दळणवळण,यंत्रसामुग्री आशा कोणत्याही सोयी उपलब्ध नसताना सारं काही पार पडत होत.
पहाटेच्या वासुदेव वाणीने दिवस सुरू व्हायचा.सडा- सारवण,रांगोळी काढून,तुळशी वृंदावनाचे पूजन व्हायचे..देवदेवतांचे पूजन होऊन जेवणं केली जायची.भाकरी बांधून माणसं दिवसभर पोटापाण्याचे उद्योग करत असत.घरातील ज्येष्ठ मंडळींचे संस्कार घडत असत.भजन-किर्तन ,यात्रा-जत्रा होत होत्या,कुस्ती, तमाशा चे फड रंगत असायचे...हीच काही मोजकी मनोरंजनाची साधने माणसाच्या जीवनात होती.पै-पाहुण्यांच्या कडे येणं-जाणं, बरेच दिवस मुक्कामी राहणं असायचं.माणसांत सलोखा,प्रेम,माया ,आपुलकी ,विचारपूस असायची.घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोती म्हणली जायची..कुटुंबांच्या एकत्रित पंगती पडायच्या..परस्परांची सुखदुःखे समजून घेतली जायची..आणि या साऱ्यातून माणूस समाधानी आयुष्य जगत होता.. आता हे सारं बदलले आहे..माणूस एकाकी पडत चालला आहे.वेळ पुरत नाही असे तकलादू कारण पुढं करणारा माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम बनला आहे.मोबाईल, टी.व्ही यातील आभासी मनोरंजनात,तंत्रज्ञानात गुरफटून तो पुरता एकटा होत आहे.कायम असमाधानी वृत्तीतून भौतिक सुखाच्या मागे स्वतःला नित्य धाववत आहे.घराला घरपण उरले नाही.परमेश्वराच्या शोधातही तो बाहेरच्या,दूरवरच्या देवळांमधून गर्दी करत आहे. यात भक्तिपेक्षा भटकंती करण्याचाच उद्देश होत आहे. माणसांची घरे किंमती,दिखाऊ झाली पण घरातील माणसांना किंमत उरली नाही.कुटुंबे विभक्त होऊन वृद्धाश्रमांची,पाळणाघरांची संख्या वाढत चालली आहे.यातून संस्कार मंदिरे नष्ट झाली आहेत. आपण जगतो कशासाठी आणि कुणासाठी हेच आता माणसाला कळेनासे झाले आहे.बाह्य झगमटाच्या कोशात स्वतःला गुरफटून घेतलेला माणूस कोशातच नष्ट होत चालला आहे.अपेक्षांच्या,तुलनेच्या तणावाखाली कोशातून फुलपाखरू बनून स्वच्छंदि आयुष्य जगणे तो पुरता विसरला आहे.
वेळच पुरत नाही ,खूप दगदग होते,त्रास होतो या भावनेतून समाधानाच्या आभासी दुनियेत जगणारी माणसे पाहिली की कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ,'सांगा कसं जगायचं,कण्हत कण्हत की गाणं म्हणत' या ओळी आपसूकच आठवतात.
✍🏻सुवर्णविलास
www.suvarnvilas.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा