गुरुवार, २७ जून, २०१९

संख्यावाचन -लेखन बदल अन संभ्रम

*संख्यावाचन-लेखन बदल अन संभ्रम*

कोणतेही नवे संशोधन प्रत्यक्षात अंमलात आणण्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर त्याची चाचणी काही मर्यादित घटकांवर होणे व त्यातून सिध्द होणारी उपयुक्तता,त्यातील उणिवा,अडथळे यांची जाणीव करून घेणे गरजेचे असते.जगभरात आतापर्यंत झालेल्या विविध क्षेत्रातील संशोधने ही या मार्गानी होऊन त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिली नाही हे पाहूनच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली गेल्याचे दिसून येते. शिक्षण क्षेत्रात शिकणारी मुले केंद्रस्थानी ठेवून शिकणे ही प्रक्रिया आनंददायी व्हावी व त्यातून त्याच्यात  शिकण्याची रुची निर्माण व्हावी व त्याचा बौद्धिक विकास घडून यावा याकरिता मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून सोप्याकडून कठिनाकडे या पद्धतीने त्याला शिकू दिले जाते. एकंदरीत शिकणे ही प्रक्रिया पुर्णतः मुलाच्या त्याच्या स्वतःच्या केंद्रस्थानी असते.साहजिकच शिक्षणातील कोणताही बदल प्रत्यक्षात सर्वत्र अंमलात आणण्यापूर्वी त्याची प्रायोगिक अंमलबजावणी शिक्षण घेत असणाऱ्या समाजातील सर्व स्तरातील ,सर्व प्रकारच्या बुद्धीमत्तेच्या मुलांवर करणे आवश्यक वाटते. यात आभ्यासात विविध कारणांमुळे मागे राहणाऱ्या मुलांचा अधिक विचार होणे अत्यावश्यक आहे. नवीन बदल या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीत वाढ करू शकतील का? व  करू शकत असेल तर तो कसा? हे समजणे गरजेचे असते.
संख्यावाचन लेखनातील बदल योग्य वाटत असला अचानकपणे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यापूर्वी अध्ययन पातळीतील  सर्व स्तरातील मुलं केंद्रस्थानी ठेवून सदर बदलास त्यांचा मिळणारा प्रतिसाद कसा आहे? या बदलाची प्रायोगिक चाचणी अध्ययनाच्या सर्व स्तराच्या पातळीतील मुलांवर  केली गेली असेल व ती 100 टक्के यशस्वी झाली असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच या बदलाने मुलाच्या शिकण्यात काही अडथळे निर्माण होतात का? अध्ययनातील सर्व स्तरातील मुले या बदलाने एकसमान पातळीवर येतात का? नसतील तर का येत नाहीत? मग नेमकी कुठे उणीव आहे? ती कशी दूर करता येईल? त्यासाठी केलेल्या बदलात आणखी काही बदल गरजेचे आहेत का? याचा साकल्याने विचार होऊन मगच सर्वमान्य  असे बदल करून ते प्रत्यक्षात सर्वत्र अंमलात आणणे अपेक्षित आहे. सद्याच्या संख्यावाचन -लेखन बदलात असे काही झालेले दिसत नाही.विशिष्ट अभ्यासगटाने घेतलेला घाईने निर्णय व त्याची अंमलबजावणी ही विद्यार्थीकेंद्रित -शिक्षणकेंद्रित असूच शकत नाही. कारण विद्यार्थी व त्याचे शिक्षण,त्याचे शिकणे यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी निर्माण करून देणाऱ्या शिक्षकाला या बदलाची कोणतीही पूर्वकल्पना, पूर्वप्रशिक्षण न देताच ही पद्धती स्वीकारणे भाग पाडले आहे असे वाटत आहे.
     एकंदरीत थोड्या व सर्व  अध्ययन पातळीवरील विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून प्रायोगिक चाचणीतून निष्पन्न होणारे परिणाम जाहीर करून ते यशस्वी ठरले आहेत असे असते तर आज या बदलावरून शिक्षण घटकांत निर्माण झालेला संभ्रम झाला नसता.

✍© सुनिल अस्वले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा