मंगळवार, ९ जुलै, २०१९

आठवणीतील पाऊस

आठवणीतील पाऊस

पाऊस म्हंटलं की मनात आठवणींचा पूर आल्याशिवाय राहत नाही. समस्त सृष्टीला भिजवणारा पाऊस माणसाच्या मनालाही  आठवणींनी भिजवतो. माझ्या आयुष्यतील असाच एक पाऊस की ज्याने आम्हां उभयतांच्या नवजीवनाच्या प्रारंभी आपल्या जलाभिषेकाने आम्हांला जणू आशीर्वादच दिला तो बेभान होऊन कोसळलेला पाऊस मला आजही  आठवतो. 22 जून 2003 हा आमच्या लग्नाचा मुहूर्त. दोन्हीकडील कुटुंबात आनंद ओसंडून वाहत होता. अन त्या सोबतीला अधूनमधून थोडी विश्रांती घेत बरसणारा पाऊसही होता.वऱ्हाडी मंडळींच्या स्वागतापासूनच अवघी सृष्टी चिंब न्हाऊन गेली होती. सकाळी देवदर्शनसमयी उजाडलेल्या या वरुणराजाने लग्नमंडपात हळदीच्या प्रसंगी आपली हजेरी लावलीच.सौभाग्यवतीच्या शिरावर छत्र धरूनच हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्यांनतर पुन्हा काही क्षण विश्राती घेतलेल्या वरुणदेवाने ऐन अक्षताच्या समयी पुन्हा असा जोरदार जलवर्षाव सुरू केला की वाटले तो ही आपल्या करांतून जलरूपी अक्षता आम्हां उभयतांच्या शिरावर  टाकून आमच्या सुखी संसाराकरीता आशीर्वाद देत आहे. पण त्याचा जोर इतका होता की लग्नास उपस्थित राहिलेल्या सर्व आप्तेष्ट,मित्रमंडळी,ग्रामस्थ यांना त्याने चिंब करून टाकले होते.सुमारे तासभर अखंड कोसळणाऱ्या या पावसाने उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाला लग्नाच्या हॉल मध्येच खिळवून टाकले. आजही जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा प्रत्येकजण त्या पावसाला आठवल्याशिवाय राहत नाहीत. मलाही आमच्या लग्नास मुहूर्तावर उपस्थित राहिलेला अन मला माझ्या जीवनात सौभाग्यवतीच्या रूपाने भरभरून आनंद,प्रेम मिळवून दिलेला तो  पाऊस अन दिवस आजही मनात ओथंबून येतो.
© सुनिल अस्वले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा