शनिवार, ७ मार्च, २०२०

आजच महिलादिन....

आजच सारे कोडकौतुक,
आजच साऱ्या शुभेच्छा भरभरून ...

आजच वर्णिली जाईल
 महती तुझी अगणित ,
आज गायले जातील,
पोवाडे तुझ्या शौर्याचे ....

आजच म्हणतील सारे 
तू आहेस सबला,
आजच देतील सारे
 मान-सन्मान तुला..

आजच म्हणतील तुला
तू आहेस देवी,
तू आहेस शक्ती,
आजच करतील सारे
तुझा उदोउदो.....

आजच देतील तुला
वागणूक समानतेची ...
आजच होतील तुझ्यावर 
भाषणे,चारोळ्या,
अन कविता उदंड...

आजच होईल तुझ्या
कीर्तीचे गुणगान,
आजच होईल 
चर्चा तुझ्या हक्काची ..

आजच होईल सर्वांना 
जाण तुझ्या अस्तित्वाची ...

मग तुही आजच 
जाशील भारावून
आणि उद्यापासून पुन्हा 
तुझ्यासोबत घडेल तेच ते...

उद्यापासून,

हरघडीचा तिरस्कार घेईल,
जागा तुझ्या आजच्या कौतुकाची 
अन ऐकूही वाटू नयेत अशा शिव्याशाप ..
घेतील जागा तुझ्या  शुभेच्छांची 

क्षणोक्षणीची निंदा घेईल 
जागा तुझ्या महतीची  
अन भिती घेईल 
जागा तुझ्या शौर्याची  ...

होशील तू पुन्हा अबला
जागा घेईल अवमान 
त्या आजच्या मान -सन्मानाची 
अन देवी ऐवजी असशील 
तू फक्त सहनशीलतेची
 एक निर्जीव वस्तू...

 लिंगभेदाचे आसूड नित्य
ओढले जातील तुझ्या पाठीवर
अपकीर्तीची माला घालतील 
हेच सारे तुझ्या गळ्यात..

हक्कांऐवजी कर्तव्याचे भूत
बसेल पुन्हा तुझ्याच मानगुटीवर
अन वर्णिली आणि चर्चिल्या जातील
 फक्त नि फक्त
तुझ्या मर्यादा आणि उणिवा..

असणार नाही कुणाला
तुझ्या अस्तित्वाची जाण
तुला असेल फक्त नि फक्त
सोसत राहण्याचा मान..

आणि मग पुन्हा 
फिरून येईल तो तुझा आजचा एकच दिवस 
तोपर्यंत तुझे तेच ते ,तेच ते...
पुढील महिला दिनापर्यंत...
पुढील महिला दिनापर्यंत...

✍ सुवर्णविलास
         08/03/2020
www.suvarnvilas.blogspot.com

1 टिप्पणी: