Father
बाप....
दिवस शनिवारचा, सकाळची शाळा. पहिले काही तास संपल्यानंतर शालेय पोषण आहार देण्याची वेळ.मीही थोडा नाश्ता करून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शालेय आवरातील विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत व्हरांड्यात उभा होतो.मुलेही आपले जेवण आटोपून स्वछंदपणे गप्पा मारणे,कोणी खेळ खेळणे तर कोणी नुसतेच उभे राहलेली.हे सर्व पाहत मी उभा होतो.गेल्या चार-पाच दिवसांत उसंत न घेतलेल्या पावसाने क्षणभर विश्रांती घेतली असता मैदानावर साचलेल्या पाण्यात उड्या मारताना काहीजण मला दिसत होते.पण त्यांच्या या बालआनंदात व्यत्यय आणण्यास माझे मन तयार नव्हते.इतक्यात चिन्मय माझ्याजवळ आला नि त्यांच्या कृत्याची तक्रार नोंदवू लागला.आता याच्याही मनाचे समाधान करणे मला भाग होते.मग शिस्तीच्या नावाखाली मी त्या मुलांना उगाच रागवण्याचा अविर्भाव आणून तेथून हटकले.याक्षणी तक्रार घेऊन आलेल्या चिन्मयची आनंदी मुद्रा माझ्या नजरेआड झाली नाही. हे सर्व न्याहाळताना ,अनुभवताना तिसरीच्या वर्गातील संकेत माझ्याजवळ आला नि मला नुसतीच हाक देऊन गेला.त्याचा हा हाक मारण्याचा एपिसोड टि.व्ही.वरील मालिकांप्रमाणे रिपिट होत राहिला.त्याच्या प्रत्येक हाकेला मी ओ देत होतो.शेवटी न राहवून मी त्याला थोडा वैतागुनच विचारले,अरे संकेत!काय काम आहे?का उगाच सारखा बोलावत आहेस? मी काय कुठे पळून चाललो आहे की काय? एका दमात एवढं सारे बोलून झाल्यावर मला वाटले आता हा घाबरून वर्गात जाईल.पण या महाशयांनी माघार घेतलीच नाही.यापुढे संकेत मला म्हणाला ,मग शाळा सुटल्यावर जातासा की घरी.त्याच्या या बोलण्याचा मला राग आला पण त्याला आणखी बोलते करण्याच्या हेतूने मी राग मागे सारून त्याला विचारले,अरे संकेत मग इथेच राहू का? नि मग मी जेवायचे कोठे? यावर तो उत्तरला राहा की इथे नि जेवा आमच्या घरी.या त्याच्या बालबुद्धिचे मला आता जरा जास्तच कुतूहल वाटायला लागले नि त्याला आणखी बोलते करायचे ठरवून मी त्याला म्हणालो,अरे! माझ्या घरचे माझी वाट पाहतील की! त्यांच्याकडे नको का जायला मला? या माझ्या प्रश्नावरही त्याने उपाय शोधून ठेवलेला होताच.जावा की शनिवारी आणि रविवारी परत या सोमवारी.
आता मात्र मला त्याच्या जाणतेपणाची जाणीव व्हायला लागली होती.सध्याची पिढी कशात मागे राहू शकत नाही याचा प्रत्यय मला येत होता.मी त्याच्याकडून क्लीन बोल्ड होण्याच्याच मार्गावर होतो.तरीही मी माझी विकेट सहजासहजी गमवायची नाही ठरवलेलं.याच निग्रहानं मी त्याला विचारले, संकेत बाळा तुला चालतं का तुझे बाबा तुझ्याजवळ नसलेले? करमत का तुला त्यांच्याशिवाय? आता आपण याला षटकार खेचला आहे ही माझी अहंमिक भावना.पण त्याने यापुढे टाकलेल्या याँर्कर चेंडूने मात्र माझ्यातील गुरूजी नि बाप दोघांची विकेट काढली.
तो तिसरीच्या वयोगटातील विद्यार्थी.जेमतेम नऊ वर्षे वयाचा.या वयात मानसशास्त्रीय दृष्टिने विचार करता मुलांना भावनिक,शारीरिक सुरक्षितता महत्वाची असते.ही सुरक्षितता त्याला सर्वप्रथम त्याच्या आई-वडील नि कुटुंबातील इतर सदस्यांकडून असते.त्याचे त्याच्या कुटुंबातील प्रत्येक घटकाशी अतूट नाते असते.असे नाते की ज्याच्या आधारावर तो आपल्या आयुष्याची शिडी बळकट करत असतो.नि या भक्कम पाय-यांवर स्वार होत तो आयुष्यातील अनेक आव्हाने पेलत यशशिखर गाठतो.हा सर्व तर्क या विद्यार्थ्याच्या उत्तराने पूर्णत: निष्क्रिय केला असे मला वाटते.संकेत अगदी सहजच म्हणाला ,करमतय की.पप्पा नसले म्हणून काय झाले.मम्मी आहे की घरी.
मी क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहीलो नि शेवटी माझा झालेला पराजय मला आवडेना म्हणून मग मी त्याच्यावर चिडून त्याला वर्गात जाण्यास सांगितले.
संकेत वर्गात निघून गेल्यावर माझे पुढे कशातच मन लागेना.पप्पा नसले म्हणून काय झाले; मम्मी आहे की घरी.त्याच्या या वाक्याने माझ्यातील बापपणाला पुरते विचारमग्न केले होते.याच नव्हे तर बालवयातील नि युवावस्थेतील मुलांच्या मनात 'बाप' कसा असेल?त्यांच्या जीवनात बापाचे स्थान काय असावे? आई इतकाच जिव्हाळा,ओढ,माया बापाबद्दल मुलाच्या मनात असते का? संकेतने असे का म्हटले असावे? बाप यांत कुठे नि का कमी पडतो?या प्रश्नांचे विचारचक्रच माझ्या मनात घुमू लागले.
प्रत्येक मुलाच्या जीवनात त्याच्या आईचे अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे.'आई माझा गुरू,आई कल्पतरू ,सौख्याचा सागरु,आई माझी' या श्लोकातून आईचे जीवनातील स्थान अधोरेखीत होते.पण आई प्रमाणेच मुलाच्या जीवनप्रवासात बापदेखील तितकाच महत्त्वपूर्ण असतो.पण संकेतच्या या वक्तव्याने मात्र बापाचे सध्याच्या मुलांच्या मनातील स्थान काय असावे हे विचारधीन झाले. बाप हा केवळ भौतिक सुखसोयी करून देणारा,कुटुंबाच्या गरजा भागवणारा घटक असेच का त्याचे नाते असते.केवळ बापच कमविता असेल तर त्या घरातील मुलांचे ऋणानुबंध आईशी जसे जुळलेले असतात तसे ते बापाशी जुळत नसावेत का? कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वाधिक वेळ कुटुंबातून बाहेर राहिल्याने व त्यात भर म्हणून मुलांचे संगोपन या संकल्पनेत डोकावलेला पुरषी अहंकार या कारणांनी या बापाचे मुलाशी इतके घट्ट नाते तयार होत नसावे जितके मुलाचे त्याच्या नित्य सहवासात असलेल्या त्याच्या आईशी असते.क्षणभर डॉ.सलील कुलकर्णी यांनी गायलेले 'कोमेजून निजलेली एक परीराणी.... या गीताच्या ओळी कानावर गुंजन करु लागल्या नि मन घरातील माझ्या मुलांकडे धाव घेऊ लागले.पण शाळा सुटायला अजून तासभर वेळ होता.'Emotions are not great than our duty' या सुवचनाचीही आठवण याक्षणी मनात होती.शेवटी मी माझी कर्तव्यपुर्तता करून शाळा सुटल्यावर घरी मार्गस्थ झालो.घरी पोहचल्यावर आजच्या उर्वरित दिवसातील बहुतेक वेळ मी माझ्या ऊर्जास्रोत असणा-या मुलांच्यासोबत व्यतीत केला. तसे मी नेहमीच दिवसातील अधिक वेळ माझ्या दोन्ही मुलांच्या सोबत घालवतो.आई इतका किंबहुना थोडा जास्तच माझा सहवास माझ्या या दोन्ही बालवयातील मुलांना हवा असतो.
जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना आजच्या या धावपळीच्या युगातही आपल्या मुलांचे पालकत्व आईच्याच ममतेने बापाने जोपासावे असे मला मनोमन वाटते .मुलांना त्यांचा बाप आई इतकाच हवाहवासा वाटावा यासाठी प्रत्येक बापाने आपल्या मनात माऊलीची स्थापना करायला काय हरकत आहे. असे घडले तर भविष्यात 'आई-बाबा माझे गुरू,आई-बाबा कल्पतरु,सौख्याचा सागरू आई- बाबा माझे' असाही श्लोक मुलांच्या ओठी येईल ना!
यापुढे जाऊन ज्या घरात भौतिक सुखप्राप्ती करिता धावणा-या बापाच्या जोडीला मुलाची आईदेखील घराबाहेर पडून धावत आहे त्या घरातील मुलाचे मन कोणाला शोधत असेल हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न अनुत्तरितच राहतोय.
---- समाप्त.
-----✍️©श्री.सुनिल विलास अस्वले,रा. वडणगे,ता.करवीर,जि.कोल्हापूर. पदवीधर अध्यापक -केंद्र शाळा दळवेवाडी, ता.पन्हाळा. मोबाईल-9049211785 ------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा