🙏🙏------गुरुपौर्णिमा-----🙏🙏
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः|
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम: ||
गुरु म्हणजे ब्रम्हा , विष्णु आणि महेश यांचे रूप.या साक्षात परब्रम्हाला माझा नमस्कार असो! असा गुरुमहिमा आपल्या भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे.
मानवी जीवन हे परस्परावलंबी असते.'एकमेकां साहाय्य करू,अवघे धरु सुपंथ.' या उक्तीप्रमाणे मनुष्यमात्र आपले जीवनमान सुधारण्यासाठी,उंचावण्यासाठी इतरांची मदत घेतच असतो. कोणीही एकटा जीव स्व-सामर्थ्यावर जीवन व्यतीत करू शकत नाही.आपल्या या सुंदर जीवनाला घडविण्याचे,त्याला पाठबळ देण्याचे,आधार देण्याचे कार्य कुटुंबातुन सुरु होते.पुढे जाऊन समाजातील ज्ञात-अज्ञात घटकही आपल्या आयुष्याला,व्यक्तित्वाला उभारी देण्याचे,निर्भयता देण्याचे कार्य आपल्या परीने करत राहतात.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर भेटणारे ,लाभलेले हे सर्व ज्ञात-अज्ञात घटक म्हणजेच आपले गुरू.
मनुष्याच्या जीवनात गुरू हे दिशादर्शक,दीपस्तंभ,मार्गदर्शक आहेत.आई-वडील या जीवनाच्या आद्यगुरुप्रमाणेच चांगले शेजारी,चांगले मित्र तसेच चांगले शिक्षक वा गुरू आयुष्याला लाभणे महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे.आपल्या या गुरुवर्यांच्या आचार-विचार,मार्गदर्शनाचा प्रभाव आपल्यावर होऊन आपले योग्य असे जीवनमान घडत राहते.जीवनाला योग्य ती दिशा देवून आपल्या जीवनाचे उन्नयन करण्याचे कार्य या गुरुंकडून घडते.शिकणे,अनुकरण करणे ही मनुष्याची जन्मजात प्रवृत्ती असते.जन्माला आल्यापासून आई -वडील,आजी-आजोबा ,भावंडे कुटुंबातील इतर सदस्य यांच्या शिकवणीचे अनुकरण,पालन करीत मनुष्य आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण करत राहतो.
विधायक शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन आपले आयुष्य आधिक सुंदर,परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.हे शिक्षण घेत असताना अनेक प्रकारच्या अनुभवांची शिदोरी,परिस्थिती,निसर्गातील घटना,पुस्तके तसेच आपले आई-वडील,आदर्श व्यक्तिमत्वे,शिक्षक आणि देवता यांसारख्या आदर्शरूप घटकांचा प्रभाव आपल्यावर पडत राहतो.याच्यामाध्यमातून मनुष्य औपचारिक-अनौपचारिकरित्या स्वतःला 'घडवत' जातो.आयुष्याला विधायक वळण लागणे महत्त्वपूर्ण असते यासाठी सद्गुरुंना शरण जाऊन त्यांचे नम्रभावे शिष्यत्व पत्करणे कधीही योग्य ठरते.
ज्याप्रमाणे जलाशिवाय समुद्र,सूर्य-तारकांशिवाय आकाश,भावविन भक्ती,राजाविन सेना या गोष्टी जशा विसंगत नि अपूर्ण वाटतात तसे सद्गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे.म्हणुनच श्री समर्थ रामदासांनी 'सद्गुरुविण जन्म निष्फळ' असे म्हटले आहे.ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी नौकेची आवश्यक्ता असते तद्वतच संसाररूपी हा भवसागर पार करण्यासाठी गुरुची आवश्यक्ता असते.
या भुतलावावर थोर विभुतींनी समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचे कार्य केले.संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत नामदेव ,संत तुकाराम ,या संतांबरोबरच छत्रपती शिवराय,स्वामी विवेकानंद,साने गुरूजी ,महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांनी समाजोद्धराचे कार्य केले पण या व अशा सर्व महापुरुषांना त्यांच्या जीवनात सद्गुरुंचे आशीर्वाद लाभले.कोणी आपल्या मातेस,कोणी आपल्या बंधूस तर कोणी आपल्या शिक्षकांस गुरू मानून त्यांच्या मार्गदर्शनाने कार्य केले म्हणून हे सर्व महापुरुष,वंदनीय ठरले.प्राचीन काळी श्रीकृष्ण,श्रीराम यांनीही वसिष्ठ ,संदीपनी ऋषींकडे ज्ञानार्जन केले.आपण ज्यांच्याकडून विद्यार्जन करून आपण आपला स्वतःचा,आपल्या कुटुंबाचा,समाजाचा,राष्ट्राचा उद्धार करतो त्या गुरुंना मनोभावे स्मरण करून त्यांचा सन्मान करणे,कृतज्ञता व्यक्त करणे,त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे आपले कर्तव्य आहे.म्हणुनच 'गुरुपौर्णिमा' हा दिवस सर्वच क्षेत्रांत आपणांस ज्ञानदान करणा-या गुरुंप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
या शुभदिनाचे औचित्य साधुन मीही माझ्या जीवनातील माझे आद्यगुरू माझे आई-वडील,माझी भावंडे तसेच माझ्या औपचारिक शिक्षणातील माझ्या अंगणवाडीतील ताईपासून उच्च शिक्षणातील प्राध्यापकांपर्यंत तसेच आज शिक्षक म्हणून कार्य कर ताना मला लाभलेले आजअखेरचे सर्व मार्गदर्शक गुरुवर्यांना मी साष्टांग नमन करतो. या सर्वांच्या आशिर्वादाने मी आज जरी गुरूच्या भुमिकेत असलो तरी मला आजपर्यन्त जीवनानुभव देणा-या या प्रत्येक गुरूंचा मी आजही शिष्यच आहे.आजच्या व्यासपूजेच्या निमित्ताने माझा या समस्त गुरूंना मनोभावे साष्टांग नमस्कार!
शेवटी ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे,
सद्गुरु सारिखा असता पाठीराखा,
इतरांचा लेखा कोण करी ,
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो,
आता उध्दारलो गुरुकृपे ॥
------सुवर्णविलास (सुनील अस्वले,9049211785)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा