#करवंद #कोल्हापूरकर #कोल्हापूरहायकर्स
*आली डोंगरची मैना आली,आली काळी मैना आली...*
अशी आरोळी ऐकू आली की पावलं आपसूकच घराबाहेर पडत.अन नजर डोक्यावर कापडात बांधलेली बुट्टी घेऊन भर उन्हात फिरत असलेल्या ,डोंगर दऱ्यात वावरणाऱ्या, दूरवरच्या वाडी वस्तीवरून आलेल्या बाबाला नाहीतर बाईला शोधायची. त्यापैकी कुणी दिसले की 'ए बाबा' , 'ए बाई' हिकडं ये...अस म्हणून त्यांना दारात बोलवायचे. डोक्यावरची ती बुट्टी कधी एखादा खाली उतरते आणि त्यात एकमेकांना बिलगून बसलेली काळी मैना कधी खायला मिळते असं होतं असे.दारात आल्यावर उंबऱ्याजवळच डोक्यावरची बुट्टी उतरली जायची.त्या बुट्टी खाली डोक्यावर ठेवलेली रुमालाची चुंबळ काढून खाली ठेवायचे.माझं सारं लक्ष त्या बुट्टीतल्या काळ्या मैनेकडं असायचं. आई सगळ्यात आधी त्यांना पाणी घेऊन यायची कधी कधी एखादी भाकरी अन कालवण असलं तर ते पण दिलं जायचं. उन्हातान्हातून गावभर फिरत असताना कोरड पडलेल्या घशात तांब्याभर पाणी रितं व्हायचं अन मग पिळदार मिशा पुसत अन जर बाईमाणुस असलं तर डोक्यावरचा पदर नीट करत त्याच पदरानं तोंड पुसत दिलेली भाकरी खात खात कुठल्या गावचं,इथवर कसं आलासा अस बोलता बोलता कशी दिलं करवंद अशी विचारणा व्हायची.. मग कोवळ भर मक्क ,ज्वारी नाहीतर मापट भरून भात द्यायच्या बदल्यात कोवळं भरून करवंद दिली जायची. कधी कधी या करवंदासोबत आंबट-गोड चवीचे अळू देखील असायचे.मग ते देखील घ्यायचा माझा हट्ट होत असे. एकदा का ही काळी मैना पदरी पडली की मग तिला पाण्यात खळबळून कधी खाऊ असे व्हायचे. आई मग आम्हां भावंडांना ही करवंद वाटून द्यायची. करवंद हातात पडताच ती नीट बघून खावा ही सक्त ताकीद असायची... मग हळूहळू आंबट - गोड अशा काळ्या मैनेचा स्वाद घेतला जायचा..
चैत्र पालवी फुटली की डोंगरदऱ्या मध्ये हिरव्यागार काटेरी झुडुपात काही कच्ची असलेली हिरवी ,पिकत असलेली लाल आणि पिकून तोंडाला पाणी आणणारी गर्द काळी करवंद म्हणजेच भर उन्हात डोंगरात निसर्गानं पिकवलेलं एक अप्रतिम सौदर्यच.. ज्या त्या ऋतूत बहरणारा हा रानमेवा मानवासाठी निसर्गानं दिलेलं वरदानच आहे.त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदात लोहाचं प्रमाण मुबलक असतं म्हणून शरीरातील पाण्याचं होणारं जास्तीच उत्सर्जन आणि शरीराचं तापमान यांचा समतोल ठेवण्यासाठी करवंद खावीच.
डोंगरदऱ्यात ,वाडीवस्तीवर राहणाऱ्या ,काबाडकष्ट करणाऱ्या माणसांच्या उदरनिर्वाहाचं रानमेवा विक्री हे एक महत्वाचं साधन होय. याकरिता आपल्या कुटुंबातील बारीकसारीक पोराबळांना सोबतीला घेऊन करवंदाच्या जाळ्या धुंडाळत अख्खा डोंगर पालथा घालायचा.तोडता तोडता चिकट झालेली बोट ,अन एखादं करवंद तोंडात टाकत सूर्य डोक्यावर कधी येतो हे देखील कळत नाही. अन मग तिथून पुन्हा प्रवास सुरु गावागावात आरोळी देत..,आली डोंगरची मैना आली,आली काळी मैना आली...
अलीकडे हा रानमेवा गावोगावी फिरून विकणारी पिढी कमी होताना दिसत आहे..'आताची पोरं कुठं जात्यात बाबा करवंद काढायला', हे गावोगावी पायी चालत येणाऱ्या या जुन्या लोकांच्या तोंडचं वाक्य हा रानमेवा भविष्यात दुर्मिळ होईल हेच दर्शवते.
कोल्हापूर हायकर्स च्या वतीने आयोजित पावनखिंड भ्रमंती वेळेस या रानमेव्याचा प्रत्यक्ष डोंगर दऱ्यात जाऊन आस्वाद घेताना लहानपण डोळ्यासमोर तरळून गेले. त्यातूनच हे शब्दांकन...😊
✍🏻 सुनिल सुवर्णा विलास अस्वले.(सुवर्णविलास)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा