*लोप पावत चाललेली भारतीय संस्कृती*
स्वतःकडे जे जे आहे ते ते स्वतःसाठी राखून ठेवणे ही मानवी प्रकृती,आहे त्यापेक्षाही अधिकची अपेक्षा करणे ही विकृती आणि जे जे आहे ते ते स्वतःस गरजेइतके ठेवून उपेक्षितांना देणे ही संस्कृती.देण्याचा आनंद हा भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा.पूर्वीपासून आदर,प्रेम,संस्कार,नितिची-चारित्र्याची शिकवण,भूतदया हे सर्व देणे नि जपणे ही गोष्ट म्हणजे संस्कृती आहे.निसर्ग हा संस्कृती चा आद्यगुरु आहे.निसर्ग हा पर्यावरणातील सर्व घटकांना आपल्याकडे जे जे आहे त्याची मुक्तहस्ते निरपेक्ष भावनेने देत उधळण करतो नि चराचरात आनंद भरून टाकतो. आपल्या कृतीने,कर्तुत्वाने,वृत्ती-प्रवृत्तिने ,आचरणाने इतरांच्या चित्तवृत्ति उल्हासित करता येणे हीच खरी संस्कृती होय, जी या भारतवर्षात अनादिकालापासून नांदत आली आहे. आश्रम,गुरूकुल,एकत्रित कुटूंबे,शेजारी,लहान गावे ही संस्कृती निर्मिती,संवर्धन नि दृढीकरणाची प्रमुख स्थाने पूर्वी ओसंडून वाहत होती.याच्या प्रवाहात अनेक सद्विचारांची निर्मिती होऊन या विचारांनी समाजजीवनात सुसंस्कृतीची रुजवण केली.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.सुसंस्कृतीचे जतन केल्यानेच मनुष्याच्या सामाजिकतेची जोपासणा आजतागायत झालेली दिसून येते.जेव्हा- जेव्हा,जिथे-जिथे संस्कृतीचे अध:पतन झाले तिथे त्या समाजाचा पर्यायाने मानवाचा विनाश घडल्याचे इतिहासापासून आपणांस पाहायला मिळते. संस्कृतीच्या निर्मितीत मानवाचा मोठा वाटा आहे.निसर्गदत्त लाभलेल्या भौतिक सुविधांचा,जीवनाचा आपल्या प्रयत्नांनी योग्य तो बदल घडवून सर्वांसाठी आनंदप्राप्ती,उपयुक्ततता निर्माण करणे म्हणजे संस्कृती.
फार वर्षापूर्वी गावे होती आणि तीही लहान होती पण या लहान गावात राहणारी माणसे परस्परांजवळ होती,मनाने मोठी नि निर्मळ होती.गाव म्हणजे जणू एक अख्खे मोठे कुटुंबच होते.मंदिरात भजन-किर्तने होत असत,पारावर गप्पा व्हायच्या, घरा-घराची सुख-दु:खे ही गावाची सुख-दु:खे व्हायची.माणसं माणसाला जपायचीत.पणजी -पणजोबा,आजी-आजोबा या कुटुंबाच्या वटवृक्षाच्या छायेत सारे कुटूंब भरून पावलेले असे. या ज्येष्ठांच्या बोलण्याचालण्यातून,नित्य वर्तनातून भारतीय संस्कृती व्यक्त होत असे.
संगीत,साहित्य,धर्म,मानवता,तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्या संवर्धनात आनंद शोधणे हे संस्कृतीचे सार आहे.ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो असे मानत असे की आत्म्याचे संस्करण हाच संस्कृतीचा कळस आहे.मानवाच्या ठायी असणारे दुस-याप्रती उन्नत आणि उदात्त भाव हेच या भारतीय संस्कृतीचे अधिष्ठान आहे. एकपत्नी,एकवचनी श्री प्रभू राम , श्रीकृष्णाची गीता, कर्णाचे औदार्य,एकलव्याची गुरुभक्ती, ज्ञानेश्वरांचे पसायदान,संतांची शिकवण ,जिजाऊंचे संस्कार,शिवरायांच्या मातृभक्ती,महात्मा गांधीजींचीअहिंसा,क्रांतीकारकांचा त्याग व बलिदान या सर्वांत भारतीय संस्कृती सामावलेली आहे. संस्कृती ही जगण्यात असते सांगण्यात नसते. *संस्कृती ही आईच्या दुधाप्रमाणे असते.*मानवाचे भरण-पोषण निरपेक्षपणे करण्याचे कार्य संस्कृती करते.जन्मने नि जगणे ओघाने घडते,ती एक प्रकृती असते पण कशासाठी जगावे हे या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीच्या झोपडीत शोधावे लागते. आज चंगळवादी,सुधारणावादी जगात या कुटिराचे मुल्य लोप पावत चालल्याचे प्रकर्षाने जाणवते.
ज्ञानविज्ञानाच्या बळावर स्वतःला प्रगत म्हणवणारी आजची विकृती भारतीय संस्कृतीचा -हास करू पाहत आहे.क्षणिक सुखाने जगावे कसे हे या आधुनिक जगातील सुधारणा सांगत आहेत पण कशासाठी नि कोणासाठी जगायचे, जीवनाचे शाश्वत सुख कशात आहे हे संस्कृतीच सांगते.पैशाने विकत घेता येणारी सुखे मानवाच्या आयुष्यातुन उठवत आहेत याउलट संस्कृतीने लाभणारे सुख मानवाचे आयुष्य घडवते हेच आजचा मानव विसरून सुधारणेच्या नावाखाली ऊर फुटेस्तोवर नुसताच धावत आहे.विज्ञानाच्या क्रांतीने जग भौतिकदृष्टया जवळ आले आहे पण या प्रगतीने माणूस माणसांपासून दुरावला आहे.बाह्य आनंदात रमलेल्या माणसाने आत्मिय सुख,आनंद नक्कीच गमावला आहे.आपली संस्कृती ही आपल्या असण्यात असते. सुधारणा ही आपल्या दिसण्यात असते. असणे नि दिसणे यांत दिसण्याने असण्यावर आज मात केली आहे. भारतीय संस्कृती हे साक्षात जीवनदर्शन आहे.पण आजकाल हे लोप होत आहे.वर्तमान युगात भौतिक प्रगतीचा वेग वाढला आहे पण समाजाची सांस्कृतिक पातळी खालावली आहे.चिरेबंदी वाडे,लहान घरे असणारी लहान गावे नि त्यातील असणारा कौटुंबिक जिव्हाळा लयास जाऊन फ्लँट,बंगले,शहरे यांत स्वतःच्याच भावविश्वात रमलेल्या,नात्यागोत्यांचा विसर पडलेला माणूस आधुनिकतेत स्वतःला अक्षरश: भरडत आहे. आज जगातील सुधारणेच्या नावाखाली स्वतःच्या आयुष्याला स्वतःच छळलेले लोक भारतीय संस्कृतीचे आचरण करून जीवनाचा आनंद सोहळा करत आहेत पण पिकते तिथे विकले जात नाही,दुरून डोंगर साजरे या उक्तींप्रमाणे आपण भारतीय आधुनिकीकरणाची पट्टी स्वतःच्या डोळ्यांना बांधून भारतीय संस्कृतीच्या लख्ख प्रकाशातून अधोगातीच्या अंधाराकडे वाटचाल करत आहे.अस्तव्यस्त शहरीकरण,विभक्तकुटुंबे,वाढतेवृद्धाश्रम,अनाथालये,पाळणाघरे,वाढती व्यसनाधिनता,बालगुन्हेगारी,शिक्षणाचे बाजारीकरण,वाढता भ्रष्टाचार,बदलती आधुनिक जीवनशैली,भ्रमनिरास करणारी ऐहिक सुखे ,हरवलेली संवेदना या सगळ्यांच्या प्रबळतेपुढे भारतीय संस्कृतीचे आकाश मळभले आहे.
वर्तमान युगात आधुनिकतेची कास धरून जगासोबत प्रवास करणे जरी गरजेचे असले तरी हा प्रवास भारतीय संस्कृतीच्या गाडीतून व्हायला हवा.यामुळे अपघात न घडता समस्त मानव कल्याणाच्या ध्येयापर्यंत पोहचणे नक्की होईल.आधुनिक विश्वाच्या सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य भारतीय संस्कृतीकडून व्हावे.
जय हिन्द-जय भारतीय संस्कृती!
-----सुवर्णविलास (40)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा