रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६



*स्त्रीत्वाचा शाप*

चाहुल लागता मज जन्माची,
आक्रंदन होई मना-मनात,
घोट घेण्यास गर्भात माझा,
सरसावतात हात घरा-घरात.

श्वास कोंडतो गर्भातच माझा,
असह्य वेदना माझ्या मनात,
दिव्य स्वप्ने मज जीवनाची,
विझती माते तुझ्याच उदरात.

जन्म तव जरी जाहला माझा,
मुखावरी  चिंता असे समस्ता,
स्वागत न होई हर्षभराने,
वंशाचा दिवा हवा असे समस्ता.

लहानाची  मोठी होत असता,
 पायात माझ्या रुढीच्या श्रृंखला,
मुलीच्या जातीने रहावे कसे,
हेच शिकवितात सारे मजला.

मानूनी धन परक्या घरचे,
करी आबाळ मज शिक्षणाची,
नसे पर्वा छाटती सारे पंख,
उरातील माझ्या सगळ्या स्वप्नांची,

सप्तपदी ती चालत असता,
 नयनात अनेक स्वप्न दिसे,
क्षणात कोसळी सारे इमले,
हुंडाबळी तो माझा ठरला असे.

लक्ष्मी,पार्वती ,आंबा,जगदंबा,
महिषासुरमर्दिनी असे मी,
देवी मानूनी पुजतात मला,
तरीही समजती मला अबला.

विकृत नजर शोधत असे,
झडप घालण्यास मजवरी,
श्वापदे तव असती तयार,
करती अत्याचार  निर्भयावरी.

बिकट वेदना घेऊनी ऊरी,
जीवन कंठीत राहते सदा,
सुंदर जरी हे आयुष्य देवा,
स्त्रीत्वाचा माझ्या शापच वाटे मला.

-----✍🏻 सुवर्णविलास 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा