रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६



      *घ्यावा जरा विसावा*

आयुष्यभर केलेत  अपार कष्ट
उभारला देखणा संसार
माळी बनुनी या संसाराचे
फुलवलित ही बाग बहारदार

उरी लेवुनी स्वप्न जीवनाचे
सोसले सारे क्षण आनंदाने
वेदना होत्या अनंत मनी जरी
सदैव राहिलात हसतमुखाने

मोल नाही कर्तुत्वाचे तुमच्या
अमुल्य आहे सारे काही
निःशब्द आहेत भावना मनाच्या
कृतज्ञतेचे नयन सांगती सर्वकाही

आज भूमिका तुमची वठविताना
क्षण सारे आठवतायत  आम्हांला
येते तुमच्या दिव्यत्वाची प्रचिती
आपसुक होतेय जाणीव मनाला

द्यावे आम्हांला सदैव आशिष
बळ द्यावे आमच्या मना
आजन्म रहावे पाठीशी आमच्या
मोडू न द्यावा आमचा कणा

पूर्ण झाली आहेत स्वप्ने सारी
आनंद बहु आता आपणांस व्हावा
केले अनंत आजवरी आपण
आता घ्यावा जरा विसावा.

( *ज्येष्ठ नागरिक दिनी* सर्व ज्येष्ठ नागरिकांस समर्पीत)

-------सुवर्णविलास .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा